Breaking News

ग्रंथालय, मेट्रो सुरू करण्याचे राज्य सरकारचे आदेश

मुंबई/ प्रतिनिधी

राज्य सरकारने मेट्रो आणि ग्रंथालये सुरु करण्यासाठीही परवानगी दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून नवे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आल. सर्व सरकारी आणि खासगी ग्रंथालयांना कोरोनासंबंधित नियमांचे पालन करून काम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, आठवडी बाजार भरवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. 15 ऑक्टोबरपासून कंटेनमेंट झोनच्या बाहेर आठवडी बाजार भरवला जाऊ शकतो, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात होता. हा लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथील करत आहे. 1 ऑक्टोबरपासून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. दरम्यान, शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था 31 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान, शाळांना 50 टक्के शिक्षक तसेच इतर कर्मचार्‍यांना ऑनलाईन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळा शिक्षण विभागाकडून यासंबंधी नियमावली जाहीर केली जाणार आहे.