Breaking News

राज्यात शुक्रवारपासून रेल्वेसेवा सुरु

 - देशात खासगी रेल्वे 17 ऑक्टोबरपासून धावणार

- तेजस एक्स्प्रेससाठी आजपासून बुकिंग सुरुमुंबई/ प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने 30 सप्टेंबर रोजी मिशिन बिगेनअंतर्गत  मार्गदर्शक तत्वे जाहीर करताना राज्यातील रेल्वेसेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर अखेर पाच शहरांदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि. 9 ऑक्टोबरपासून रेल्वेसेवा सुरू होणार असून, दररोज दोन्ही बाजूंकडून पाच स्पेशल ट्रेन धावणार आहे. या रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, पुणे, गोंदिया व सोलापूर या जिल्ह्यांच्या दरम्यान धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. 

दरम्यान, दसरा आणि दिवाळीपूर्वी देशातील पहिली खासगी ट्रेन तेजस रुळावर धावणार आहे. आयआरसीटीसीने (इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) ही माहिती दिली. दरम्यान, तेजस एक्स्प्रेसच्या नावाने दिल्ली-लखनऊ, अहमदाबाद-मुंबई आणि वाराणसी-इंदूर दरम्यान खासगी ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोना व्हायरसमुळे 22 मार्चपासून या ट्रेनचे परिचालन थांबविण्यात आले. पण, आता 17 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार आहेत. आयआरसीटीसीमार्फत या ट्रेन चालविण्यात येतात. तेजस एक्स्प्रेसचे तिकीट बुकिंग 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. आयआरसीटीसीकडून या ट्रेनच्या सीटचे बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. तसेच, प्रवासादरम्यान प्रवाशांना ट्रेनमध्ये पॅक करुन जेवण मिळणार आहे. मंगळवारी आयआरसीटीसी आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.