Breaking News

प्रकाश आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; तरुणाला अटक

- अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल


पुणे/ प्रतिनिधी 

वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या एका तरुणाला पुण्यात अटक करण्यात आली आहे. या तरुणावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता मनोज क्षीरसागर यांनी खडक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी फेसबुकवर अत्यंत असभ्य भाषेत एका तरुणाने 10 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून खडक पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवली आहे. सूरज चव्हाण (वय 34) असे या तरुणाचे नाव आहे. सूरज चव्हाण हा कात्रज येथील रहिवासी आहे. पोलिसांनी सोमवारी उशीरा त्याला अटक केली. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी सूरज चव्हाणावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम आणि भारतीय दंड संहिता संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सूरजला दुसर्‍या दिवशी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सूरजला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.