Breaking News

मुंबईची बत्ती गूल!

 - मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, तातडीने चौकशीचे आदेश
- लोकल ठप्प, कोविड सेंटरवरही धावपळ
- विरोधकांची ठाकरे सरकारवर जोरदार टीका

मुंबई/ प्रतिनिधी

पॉवर ग्रीड फेल झाल्याने मुंबईसह एमएमआर भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळासाठी गोंधळ उडाला. याचा रस्ते वाहतुकीसह आणि लोकल सेवेला फटका बसला. तसेच ऑनलाईन वर्ग रद्द तर झाले तर परीक्षाही पुढे ढकलल्या गेल्या. वीजपुरवठा खंडित झाल्याने कोविड हॉस्पिटलचा पॉवर बॅकअप सुरु करा, अशा सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या. जेथे ही सुविधा नव्हती तेथे प्रचंड धावपळ उडाली. मंत्रालयासह सरकारी कार्यालये, बँका, कोर्ट काही काळ अंधारात गेल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी यामुळे पाणीपुरवठ्यावर देखील परिणाम झाला. एकूणच मुंबईभर अफरातफर निर्माण झाल्याने विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले.

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल  घेतली असून, तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशीदेखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या. त्यानंतर यंत्रणा वेगाने हालली व टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरुळीत झाला. दरम्यान, सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी, जेणे करून अडचण होणार नाही, याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या होत्या. या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी, असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले होते.