Breaking News

कडूलिंबाचे झाड तोडणाऱ्याला हजार रुपये दंडासह झाडे लावण्याची शिक्षा

कडूलिंबाचे झाड तोडणाऱ्याला हजार रुपये दंडासह झाडे लावण्याची शिक्षा.
---------------
पारनेरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा निर्णय.
--------------
लोक जागृती संस्थेने केला पाठपुरावा तालुक्यात मात्र हजारो वृक्षतोड वन विभागाचे दुर्लक्ष.


पारनेर प्रतिनिधी :
    पारनेर तालुक्यातील  पठारवाडी येथील घोडोबा देवस्थान मंदिरासमोरील शंभर वर्षांहुन  अधिक जुने कडूलिंबाचे झाड तोडल्याप्रकरणी  पारनेरच्या तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा गोरे यांनी एकाला हजार रुपये दंडासह झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे.
         याविषयीची अधिक  माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील घोडाबा मंदिरासमोर मोठे कडूलिंबाचे झाड तेथील काही लोकांनी कापले होते. या बाबतची तक्रार  तेथील परिसरात राहणारे रामदास घावटे  यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी व तहसिलदार पारनेर यांच्याकडे केली होती. 


तहसिलदार ज्योती देवरे यांच्या आदेशानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पंचनाम करून संतोष बबन काळे याच्या विरुद्ध बेकायदेशीर वृक्षतोडीचा गुन्हा  दाखल करण्यात आला होता. पंचनामा करतेवेळीच संतोष काळे यांने  बेकायदेशीर झाड तोडल्याचा गुन्हा कबुल केला होता. वडझिरे वनपाल यांच्या अहवालानंतर  तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती एस.व्ही.गोरे  यांनी वृक्ष तोडणाराला महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत अधिनियम १९६४ च्या कलम ४ अन्वये  दोषी धरून हजार रुपये दंडासह येणाऱ्या पावसाळ्यात वृक्ष लागवड करून जतन करीन असे शंभर रूपयांच्या मुद्रांक कागदावर शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले. या तक्रारी बाबत लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे सतत पाठपुरावा केला होता.

वन अधिकाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत आहे.परंतु बेकायदेशीर  वृक्षतोडीचे प्रकार तालुक्यात  सर्रास चालू असुन याबाबतच्या तक्रारी केल्यावरच कारवाई होते. 
वन खाते व वृक्ष अधिकारी स्वतःहुन कोणत्याच कारवाया करताना दिसत  नाही. पारनेर येथील कार्यालयात वनअधिकारी कधीच भेटत नाहीत . फोनही स्वीकारत नाही. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
-----------
-रामदास घावटे
लोकजागृती सामाजिक संस्था