Breaking News

सत्तेत आल्यानंतर काळे कृषीकायदे रद्द करणार

 - राहुल गांधी यांचे शेतकर्‍यांना आश्वासन

- पंजाबमधील शेतकरी रॅलीत राहुल गांधी यांचा सहभागनवी दिल्ली/ प्रतिनिधी 

नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबसह ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी पंजाबला पोहचले होते. यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी राहुल यांच्यासोबत मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि नवज्योतसिंग सिद्धू उपस्थित होते. जनतेला संबोधन करताना राहुल गांधी म्हणाले की, काळ्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन असेच सुरू ठेवा. काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे. जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा तिन्ही कृषी कायदे रद्द करू, अशी ग्वाही त्यांनी शेतकर्‍यांना दिली. 

राहुल गांधी म्हणाले, की शेतकर्‍यांसाठी कायदे आणायचे असल्यास त्यावर उघडपणे चर्चा व्हायला हवी. जर शेतकरी खुश असतील तर आंदोलन का करत आहेत. असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी मोदी सरकारला केला. गेल्या ६ वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलत आहेत. पहिल्यांदा नोटबंदी त्यानंतर जीएसटी आणि आता कोरोना विषाणूच्या सावटाखाली उद्योजकांचे कर माफ केले. पण शेतकर्‍यांचे कर्ज माफ नाही केले, अशी संतप्त भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केली. तुमची जमीन आणि पैसा भारताच्या अब्जाधीशांना हवा आहे. पूर्वीच्याकाळी कठपुतळ्यांचा खेळ होत होता. पाठीमागून कुणीतरी तो खेळ चालवत असे. असे खोचक वक्तव्य करत हे मोदी सरकार नाही, अंबानी आणि अदानींचे सरकार आहे. अंबानी आणि अदानी मोदी यांना चालवतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आम्ही शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे आहोत आणि एकही पाऊल मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला. राहुल गांधी यांनी यावेळी मोदी सरकारवर हाथरस प्रकरणावरूनही निशाणा साधला. मी उत्तर प्रदेशमध्ये होतो. जिथे एका मुलीला मारण्यात आले होते. तिची हत्या करणार्‍यांविरोधात अद्याप कारवाई झालेली नाही अशी खंत व्यक्त करत पीडितेच्या कुटुंबीयांवर सरकारने दबाव टाकला असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. ही भारताची स्थिती आहे. जो गुन्हा करतो त्याच्याविरूद्ध काहीही घडत नाही. अशी चिंतादेखील त्यांनी व्यक्त केली.