Breaking News

तलाठी भरतीत अहमदनगरमध्ये महाघोटाळा!

फडणवीसांच्या नजरेखाली राज्यात ‘व्यापम’सदृश घोटाळा

- तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केला भंडाफोड; सरकारला अहवाल सादर परंतु अद्याप कारवाई नाही!

- ‘दी वायर’ने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार, फडणवीसांवर संशयाचे ढग गडद

--

भाग-1
--

अहमदनगर/खास प्रतिनिधी

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातील तलाठी भरती (क वर्ग महसुली अधिकारी)साठी निवडलेल्या 236 उमेदवारांची कागदपत्रे तपासत असताना तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मोठा घोटाळा निदर्शनास आला होता. चौकशीत हा मध्यप्रदेशात झालेल्या बहुचर्चित व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा नोकरभरती घोटाळा असल्याचे निदर्शनास आले असून, या घोटाळ्याची पाळेमुळे राज्यभर पसरली असल्याचे दी वायरने प्रसारित केलेल्या वृत्तात नमूद आहे. या घोटाळ्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. फडणवीस यांनी सचिवपदाचा दर्जा दिलेला महाऑनलाईन पोर्टलचा एक अधिकारी या घोटाळ्यात संशयित असल्याचेही दी वायरने प्रसारित केले आहे. या घोटाळ्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, जलयुक्त शिवार योजनेनंतर फडणवीस यांच्या कार्यकाळातील दुसरा मोठा घोटाळा वायरने चव्हाट्यावर आणला आहे. 

दी वायरच्या वृत्तानुसार, मागीलवर्षी नोव्हेंबर महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातील वर्ग ‘क’ महसुली अधिकारी पदासाठी (तलाठी) 236 निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासत असताना तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना काहीतरी गडबड असल्याचे आढळले. द वायरने या परीक्षा महाघोटाळ्याच्या आरोपांच्या चौकशीदरम्यान विविध उमेदवारांशी चर्चा केली. हा घोटाळा मध्यप्रदेशातील बहुचर्चित व्यापम घोटाळ्याशी साधर्म्य दाखवणारा असल्याचे दिसून आले आहे. परीक्षेला तोतया बसवण्यापासून ते उमेदवारांनी दाखल केलेल्या छायाचित्रांमध्ये बदलापर्यंत ‘द वायर’च्या शोधपत्रकारितेतून 2019 मध्ये वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’ पदांच्या नेमणुकीच्या प्रक्रियेत मोठा घोटाळा घडून आल्याचे आढळले आहे. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतल्या गेलेल्या परीक्षेत टॉपर्स असलेल्या उमेदवारांना आपल्याला कोणत्या पदावर नेमले जाणार आहे याची माहिती नव्हती. या परीक्षा कधी आणि कुठे घेतल्या गेल्या याचीही माहिती त्यांना नव्हती. जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी केल्यावर काहीजणांनी हेही सांगितले की त्यांचे अर्ज आणि हॉल तिकिटांवर त्यांच्या नातेवाइकांनी सह्या केल्या होत्या. सखोल चौकशीनंतर द्विवेदी यांना जाणवले की, त्यांच्यापैकी काहीजण परीक्षेलाच बसले नव्हते. मूळ उमेदवारांच्या जागी तोतया परीक्षार्थी बसवण्यात आले आणि महसूल विभागात महत्त्वाची पदे मिळवण्यात त्यांना मदत करण्यात आली. द्विवेदी यांनी परीक्षार्थी उमेदवारांनी दाखल केलेली कागदपत्रे आणि महापरीक्षा पोर्टल हाताळणार्‍या अधिकार्‍यांकडून खूप पाठपुरावा केल्यावर नाखुशीने दिलेल्या पुरावे नीट तपासून पाहिले. त्यातून एक मोठा घोटाळा झाल्याचे दिसून आले. या वर्षी 22 मेरोजी, जिल्हाधिकार्‍यांनी एक 12 पानी अहवाल दाखल केला आणि त्यामुळे प्रथमच हजारो उमेदवारांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फिरवल्याची शंका निर्माण झाली. त्यासोबत त्यांनी पुरावेही जोडले होते. अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी उघडकीस आणलेल्या घोटाळ्यात फक्त 236 उमेदवारांचाच समावेश नव्हता तर हा घोटाळा संपूर्ण राज्यात पसरलेला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. ‘द वायर’ने या परीक्षा महाघोटाळ्याच्या आरोपांच्या चौकशीदरम्यान विविध उमेदवारांशी चर्चा केली. हा घोटाळा मध्यप्रदेशातील बहुचर्चित व्यापम घोटाळ्याशी साधर्म्य दाखवणारा असल्याचे दिसून आले आहे.

2 जुलै आणि 27 जुलै 2019 या दरम्यान महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी 34 जिल्ह्यांमध्ये या परीक्षा झाल्या (मुंबई आणि पालघर जिल्हा वगळून.) या परीक्षा फक्त महसुली अधिकार्‍यांच्या नेमणुकीसाठीच नाही तर 2019 साली वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’ या विभागांमधील 20 पैकी 11 विभागांसाठी त्या घेण्यात आल्या. द्विवेदी यांनी आपल्या जिल्ह्यात या नेमणुकीच्या प्रक्रिया थांबवल्या असल्या तरी इतर जिल्ह्यातील प्रशासनांनी समोर पुरावे असतानाही तक्रारींकडे दुर्लक्ष केले आणि नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण केली.