Breaking News

गांधीजींचा फोटो पहिल्यांदा भारतीय चलनी नोटांवर केव्हा आला?

 


महत्मा गांधीजींची आज जयंती. आपण सऱ्हासपणे वापरत असलेल्या चलनातील नोटांवर बापूंचं चित्र पाहातो. मात्र हे चित्र नेमकं नोटेवर आलं कसं? त्यांचं चित्र चलनातील नोटेवर यावं हा निर्णय कोणाचा होता याबद्दल आज आपण खास जाणून घेणार आहोत.

महात्मा गांधी यांचा फोटो 1969 साली भारतीय रुपयाच्या नोटेवर आला. 1969 साल हे बापूंचं जन्मशताब्दी वर्ष होतं. सर्वात आधी आलेल्या नोटेवर गांधींजींच्या फोटोसोबत सेवाग्राम आश्रमही दाखवण्यात आला होता. त्यावेळी इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या आणि एल. के झा हे RBIचे गव्हर्नर होते.

1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर, आपल्या नोटांवर गांधींजीचाच फोटो असला पाहिजे असा विचार पुढे आला होता. पण तत्कालीन सरकारला यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी काहीसा वेळ हवा होता. अखेर विचारविनिमय करुन गांधीजींचाच फोटो भारतीय चलनावर असायला हवा असा निर्णय घेण्यात आला.

महात्मा गांधींचे जेवढे पोट्रेट आपल्याकडे उपलब्ध होते, त्यातल्या एका पोट्रेटचा वापर नोटांवरील फोटोसाठी करण्यात आला.ऑक्टोबर 1987 मध्ये सर्वात आधी या पोट्रेटवरील फोटोचा वापर 500च्या नोटेसाठी करण्यात आला. त्यानंतर हाच फोटो अन्य नोटांवर वापरात येऊ लागला.

1996 साली RBIने नोटांच्या स्वरुपात काहीसा बदल केला. त्यावेळी आलेल्या नोटांमध्ये वॉटरमार्क, सिक्युरिटी थ्रेड आणि अंध व्यक्तींना नोटेची किंमत चटकन समजावी यासाठी 'इंटेग्लियो' या फिचरचा वापर करण्यात आला होता.

1996 सालापासून 5,10,20,50,100,500 आणि 1,000 रुपयांच्या नोटांवर गांधींजीचा फोटो छापण्यात येऊ लागला. तसंच अशोक स्तंभाच्या जागी महात्मा गांधींजीचा फोटो प्रिंट करण्यात आला, तर अशोक स्तंभ नोटेच्या डाव्या बाजूला खाली छापण्यात येऊ लागले.

आपल्या नोटांवर जो गांधींजींचा फोटो आपण पाहतो तो 1946 साली वायसराय हाऊस (आताचे राष्ट्रपती भवन) येथे काढण्यात आला होता. मुळ फोटोमध्ये म्यानमारचे तत्कालीन राष्ट्रपती आणि ब्रिटीश सेक्रेटरी फेडरिक पॅथिक लॉरेन्स हे देखील गांधीजींसोबत आहेत. हा फोटो कोणत्या फोटोग्राफरने काढला होता याबाबत माहिती उपलब्ध नाही. पण हाच फोटो भारतीय चलनासाठी आजतागायत वापरण्यात येत आहे.