Breaking News

भाजप हा शेठजी-भटजींचाच पक्ष!

फोकस/ पुरुषोत्तम सांगळे : 

जनसंघाचा भारतीय जनता पक्ष झाला तरी तो शेठजी-भटजीचाच पक्ष होता. म्हणून तो महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजनांसाठी अस्पृश्य होता. ही राजकीय अस्पृश्यता टाळण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 1980 च्या दशकात माळी-धनगर-वंजारी यांचा एक राजकीय फॉर्म्युला राबविला होता. सत्तेचे गणित जुळवायचे असेल तर मराठ्यांच्या पाठीमागे जाणारी माळी, धनगर आणि वंजारी या मोठ्या समाजांची एकत्रित ताकद भाजपकडे वळवायची, अशी ती रा. स्व. संघाची रणनीती होती. प्रमोद महाजन यांच्यासारख्या संघाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्याच्या खांद्यावर या रणनीतीला यशस्वी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. महाजन हे तर शेवटी महाजनच; त्यांनी ती यशस्वी केली. त्यातूनच माळी समाजाचे ना. स. फरांदे, धनगर समाजाचे अण्णासाहेब डांगे आणि वंजारी समाजातून गोपीनाथ मुंडे असे नेतृत्व पुढे आणण्यात आले. फरांदे, डांगे यांचा राजकीय वापर करून झाल्यानंतर त्यांना अडगळीत टाकण्यात आले. भाजप आणि संघालाही पुरून उरले ते फक्त गोपीनाथ मुंडे. मुंडेंनाही पक्षात आणि राजकारणात संपविण्याचा प्रयत्न झाला नाही असे नाही; तसा तो झाला. एकवेळ तर मुंडे हे काँग्रेसमध्ये जाण्यासाठी तयार झाले होते. तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मुंडेंना काँग्रेसमध्ये घेण्यापासून रोखले नसते तर आज मुंडेसाहेब काँग्रेसमध्येच असते; आणि कदाचित सत्तेच्या सारिपाटाच्या खेळात यशस्वी होऊन ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही असते. शिवाय, भाजप नावाचा पक्ष राज्यात औषधालाही उरला नसता. सांगायचे तात्पर्य असे, की 1980च्या दशकप्रारंभी भाजपमध्ये सत्तेची गणिते जुळवण्यासाठी ‘माधव’चा जन्म झाला. पूर्वीचा जनसंघ आणि त्यानंतर भाजप झालेल्या पक्षाची मूळ ओळख ही शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून होती. परिणामी, सत्तेचा सूर्य कधी उगवणारच नाही, अशी भीती त्यांना सतावत होती. त्यातूनच ‘माधव’ फॉर्म्युला अस्तित्वात आला आणि याचे कर्तेधर्ते होते रा. स्व. संघाचे चाणाक्ष नेते वसंतराव भागवत. आपल्या राज्यातील गावगाड्यात मराठा, धनगर, माळी या मोठ्या जातींचा पगडा आहे. या तिन्ही जाती पूर्वी एकच होत्या; हे महात्मा फुले यांच्यापासून तर परदेशी संशोधक गुंथर सोंथायमर यांच्यापर्यंत अनेकांनी सविस्तर मांडलेले आहे. या तीन जाती व्यवसायामुळे विभागल्या. मराठा (शेती), माळी (भाजीपाला पिकवणे), धनगर (मेंढ्या, बकर्‍या पाळणे) अशा व्यावसायिक विभागणीमुळे या जातीतला बेटी व्यवहार बंद झाला. आजही गावगाड्यात त्यांची सामाजिक प्रतिष्ठा सारखीच आहे. गेल्या साठ-सत्तर वर्षात गावगाड्यात मोठा बदल झाला आहे. मराठा समाज राजकीय सत्तेत स्थिरावला तर माळी समाज व्यापार, राजकारण आणि इतर क्षेत्रांत शहरात प्रगती करत आहे. या तुलनेत धनगर समाजाची फरपट मात्र संपलेली नाही. तर वंजारी समाजाने स्वकष्टाने कोयता सोडून शिक्षणाची कास धरत सहकार, राजकारण आणि प्रशासनात आपले अस्तित्व निर्माण केले. अर्थात, त्यासाठी गोपीनाथ मुंडे यांचा दूरदृष्टीकोन आणि धोरणात्मक निर्णय कारणीभूत आहेत. गोपीनाथ मुंडे यांनीच 2014 च्या निवडणुकीपूर्वी ‘माधवं’ फॉर्म्युल्याची नव्याने आखणी करत, शिवसेनेला सोबत घेत, सत्तेचा सोपान चढला होता. परंतु, दुर्देवाने मुंडेसाहेबांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर ब्राम्हणी काव्याने सत्तेवर आलेल्या नेतृत्वाने हा फॉर्म्युला मोडित काढण्याचे काम केले. राज्यात भाजप सत्तेवर येण्यासाठी गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे या बहुजन समाजातील नेत्यांनी जीवाचे रान केले होते. आज सत्तेची फळे चाखणार्‍या नेत्यांना जेव्हा राज्यात काळेकुत्रेही विचारत नव्हते, त्या काळात खडसे-मुंडे हे नेते भाजपला तळागाळात पोहोचविण्यासाठी कष्ट उपासत होते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी खडसेंना बाजूला सारण्यात आले; आणि तेथून पुढे बहुजन नेतृत्वाची अडगळ सुरु झाली. आता खडसे यांनादेखील पक्षातून बाहेर पडावे लागले; आणि भाजप पुन्हा एकदा शेठजी-भटजींचाच पक्ष म्हणून उरला. गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर भाजपचा बहुजन समाजाचा चेहरा लोपला होताच; परंतु खडसे गेल्यामुळे तर भाजप हा पक्ष बहुजन नेत्यांना फक्त वापरून घेतो व नंतर त्यांना फेकून देतो, ही जनमाणसातील धारणा पक्की झाली आहे. अलिकडेच, भाजपचे केंद्रीय मंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे विधान पाहाता, त्याला पृष्टी मिळते. दानवे म्हणाले होते, की मुंडे-महाजन गेले, भाजपला काय फरक पडला. खडसे गेल्यामुळे तरी काय फरक पडणार आहे? हे बोल दानवेंचे असले तरी त्यांचा बोलविता धनी हा रा. स्व. संघ आहे. हे न कळण्याइतपत बहुजन समाज निश्‍चितच दुधखुळा नाही. आता भाजपात बहुजन म्हणून जे काही नेते उरले आहेत, ते कातडी पांघरलेले नेते आहेत. वास्तविक पाहाता, ते ब्राम्हण नेतृत्वाच्या ताटाखालची मांजर आहेत. देवेंद्र फडणवीस सांगतील तसेच ते करतील, यात कोणतीही शंका नाही. सध्या तरी बहुजन समाजाचा नेता भाजपकडे नाही. असे नेतृत्व उभे करायला दहा-वीस वर्षे लागतात, असे प्रमोद महाजनांनी एकदा सांगितले होते आणि गोपीनाथ मुंडेंना घडवायला सुरूवात केल्यानंतर सुमारे 15 वर्षांनी भाजपाने शिवसेनेच्या मदतीने राज्यात सत्ता मिळवली, हे येथे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे मुंडेंची जागा त्यांच्या कन्या पंकजा मुंडे-पालवे किंवा विनोद तावडे हे घेऊ शकत नाहीत. आधी गोपीनाथ मुंडे यांचे संशयास्पद निधन (खरे तर तो वेल प्लॅनिंग मर्डरच होता, अशी सर्वांचीच धारणा आहे) त्यानंतर भाजपच्या जडणघडणीमध्ये आणि विस्तार वाढीसाठी तहहयात झटलेल्या आणि राजकीय साठमारीमध्ये बराचकाळ अडगळीत पडलेल्या एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधणे, यामुळे एकेकाळी जनसंघ असलेल्या व नंतर भाजप नाव धारण केलेल्या पक्षामध्ये सध्या गेला ‘माधव’ कुणीकडे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. सत्तेच्या राजकारणात याच समाजातील घराणी प्रामुख्याने आजही दिसतात. परिणामी, या समाजाचे हितसंबंध जोपासत काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस  सत्तेत येत होती. आणि, नेमकी हीच बाब हेरून ‘माधव’ फॉर्म्युला जुळवण्यात आला होता. त्यासाठी मराठा समाजाव्यतिरिक्त बहुजन समाजाची मोट बांधण्यात आली होती. याच मोटेत गोपीनाथ मुंडे यांच्या रूपाने वंजारी नेतृत्व आणि समाज जवळ करण्याचा प्रयत्न झाला. तर धनगर समाजातून अण्णा डांगे व माळी समाजातून ना. स. फरांदे हे नेतृत्व पुढे आले. या तिघांना हाताशी धरून शेठजी-भटजी ही राजकीय अस्पृश्यतेची ओळख हटविण्यात रा. स्व. संघाचे धुरिण यशस्वी झाले होते. मराठाव्यतिरिक्त ओबीसी समाजाला हाताशी धरून सत्ता मिळविण्याचा हा एक मार्ग होता; पण काही कालावधी नंतर धनगर समाजाचे नेते अण्णा डांगे यांना फारसे स्थान न देऊन पद्धतशीरपणे त्यांना बाजूला ठेवण्यात आले तर विधानपरिषदेच्या अध्यक्षपदी फरांदे यांना बसवून राजकीय चौकटीतून त्यांना बाहेर काढण्यात आले. राहता राहिले ते मुंडे. त्यांना राजकारणात संपविणे सोपे नसल्याने त्यांना दिल्लीत नेण्यात आले व तेथे त्यांचे काय केले गेले? हा अख्खा वंजारी समाज जाणतोच आहे. त्यानंतर राजकीय बुद्धिबळाच्या सारिपाटावर आणखी एक बहुजन चेहरा असलेले एकनाथ खडसे हे निष्क्रिय करण्यात आले. याच काळात देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने पारंपरिक ब्राह्मण आघाडी सांभाळणारा नेता राज्यात तर नितीन गडकरी हे दिल्लीत समोर करण्यात आले. भाजप हा विस्तारवादी पक्ष असल्याने सत्तेसाठी असे अनेक प्रयोग केले जातात. या प्रयोगासाठी अनेक नेते व माणसे वापरली जातात. त्यांचा वापर झाला की त्यांना फेकूनही दिले जाते. आज भाजपात काही बहुजन चेहरे दिसतात. परंतु, नेतृत्व म्हणून एक तर ते फिक्के आहेत. या नेत्यांचीही गत तीच होणार आहे, जी यापूर्वी फरांदे, डांगे, खडसे यांची करण्यात आली. भाजप हा मूळ शेठजी-भटजींचाच पक्ष असून, बहुजन नेते हे त्यांना फक्त बहुजनांची मते मिळवण्यासाठी लागतात. कारण, ब्राम्हण व बनिया जातीच्या मतांवर ते कधीही सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाही. शिवाय, पुरोगामी महाराष्ट्रात शेठजी-भटजी हे बहुजनांना राजकीय अस्पृश्य वाटतात. आज भाजपची सर्व सूत्रे देवेंद्र फडणवीस या ब्राम्हण नेत्याच्या हातात एकवटली आहेत. ज्या बहुजन नेत्यांना भाजप आपला पक्ष वाटत असेल त्यांनी एकदा खडसे, मुंडे, फरांदे, डांगे यांचे काय झाले? याचा सखोल अभ्यास करावा. असा महत्वाचा सल्ला आम्ही त्यांना देत आहोत!

(लेखक हे दैनिक लोकमंथन वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संपादक आहेत. संपर्क 8087861982)