Breaking News

पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता, संजय सिंह यांच्यावर फेकली शाई

 


लखनऊ : आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह, हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या हाथरसमध्ये जात आहेत. संजय सिंहदेखील पीडितेच्या कु़टुंबियांना भेटायला गेले होते. त्यावेळी कुटुंबियांना भेटून बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर अचानक शाई फेकण्यात आली. 

हाथरस बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात सध्या असंतोष आहे. देशभरात उत्तर प्रदेश सरकारविरोधात निदर्शनं केली जात आहेत. देशातील विविध पक्ष पीडितेच्या कुटुंबियांना भेट देत त्यांचे सांत्वन करत आहेत. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह हे सुद्धा त्यांना भेटायला गेले असता त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. हा सगळा प्रकार अचानक घडल्यामुळे सगळीकडे गोधंळ उडाला. शाई फेकणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

घडलेल्या प्रकारानंतर परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण होते. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासन आणि उत्तर प्रदेश सराकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आप पक्षाच्या उत्तर प्रदेश विभागाने, हा दिवस योगी आदित्यनाथ यांच्या शासनकाळातील काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल, असे म्हणत निषेध व्यक्त केला. तसेच उत्तर प्रदेश सरकारकडून सामान्यांचे दमन केले जात असल्याचा आरोपही आप पक्षाने केला. हाथरस पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता पोलिसांडून अडवले जात असून मारले जात आहे, असेही आप पक्षाचे कार्यकर्ते म्हणाले. योगी आदित्यनाथ यांचे उत्तर प्रदेश सरकार दोषींना वाचवू पाहत असल्याचा आरोपही आप पक्षाने केला आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेट दिली. यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्कबुक्की केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता.