Breaking News

सामूहिक बलात्कार प्रकरणातील चौघा नराधमांना मरेपर्यंत जन्मठेप

 - बीड न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल



बीड/ प्रतिनिधी

एकट्या महिलेवर सामूहिक बलात्कार करणार्‍या चार जणांच्या टोळीला बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी चार आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे. तसेच प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यात जिजा लालसिंग राठोड (वय 30), अमोल मदन काष्टे (30), पुंडलिक बन्सी राठोड (27), नवनाथ बाबुराव जाधव (28) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना 2015 मध्ये घडली होती. पीडित महिला शेतातून घरी बीडकडे येत होती. त्यावेळी आरोपींनी  पीडितेला जीपमध्ये बसून निर्मनुष्य ठिकाणी नेत आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. नंतर मध्यरात्री पीडितेच्या गावाकडील घरी येऊन दरवाजा तोडून घरांमध्येही  बलात्कार केला होता. या प्रकरणात गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत महाजन यांनी चार आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोषींना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणामुळे पीडितेला न्याय मिळाला असून, यात सरकारी वकील म्हणून मिलिंद वाघिरकर यांनी काम पाहिले. सामूहिक अत्याचार करणार्‍या आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिल्याने गुन्हेगारांमध्ये जरब बसेल, असा विश्‍वासदेखील न्यायालयाने व्यक्त केला.

--------------