Breaking News

जुलै २०२१ पर्यंत देशातील २५ कोटी लोकांवर कोविड लसीकरण

- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती 

नवी दिल्ली/ प्रतिनिधी 

कोरोनावर प्रतिबंध म्हणून लवकरच लस उपलब्ध होईल, अशी ग्वाही प्रत्येक देशातून दिली जात आहे. त्यातच, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही एक दिलासादायक माहिती रविवारी सांगितली. जुलै २०२१ पर्यंत देशातील २५ कोटी जनतेला कोरोनाची लस दिली जाऊ शकते, असे ते म्हणाले. रविवारी संडे संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. 

डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, २०२१ च्या जुलै महिन्यापर्यंत २५ कोटी लोकांना लस देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. सरकारला कोरोना लसीचे ४०० ते ५०० कोटी डोस प्राप्त होतील आणि यातील जुलैपर्यंत २५ कोटी लोकांना लसीकरण पूर्ण होईल, असे अनुमान आहे. आपले सरकार कोरोना आजारावर नियंत्रणासाठी २४ तास काम करत आहे. तसेच कोरोनाची लस आल्यानंतर त्याच्या वितरण प्रणालीसाठी देखील काम सुरु आहे. ते म्हणाले की, आमची प्राथमिकता आहे की देशातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस कशी दिली जाईल. कोरोना लसीच्या संदर्भात एक उच्चस्तरीय तज्ञांनी कमिटीदेखील कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले.

--

सीरमची कोरोनावर लस जानेवारी शेवटपर्यंत!

कोरोनावर लस कधी येणार हा सवाल सध्या सर्वांच्याच मनात आहे. भारताचे आणि खासकरुन महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते सीरम इन्सिट्यूटच्या कोरोना लसीकडे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची माहिती दिली होती. कोरोनावर लस जानेवारी शेवटपर्यंत येईल, अशी माहिती सीरमने शरद पवारांना दिली आहे. त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, सीरम इन्स्टिट्युटमध्ये जाऊन प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे इंजेक्शन घेतले. माझ्यासोबत माझ्या स्टाफने देखील घेतले. मात्र हे कोरोनाचे औषध नाही. सीरमची लस तयार व्हायला जानेवारीचा शेवट येईल, असे मला त्यांनी सांगितले, असे शरद पवार म्हणाले.

-------------------------------