Breaking News

अतिवृष्टीची व्याख्याच शेतकऱ्यांवर अन्याय करणारी - अनिल देठे

अतिवृष्टीची व्याख्याच शेतकऱ्यांवर अन्याय करणारी -अनिल देठे
----------------
तालुक्यातील शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान होऊनही शासनाच्या निकषामुळे पंचनामे होणार नाहीत.
----------------
सरसकट नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
-----------------
मुख्यमंत्र्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी


पारनेर प्रतिनिधी -
 एका दिवसात ६५ मि.मि.पेक्षा जास्त पाऊस झालेल्या मंडलक्षेञातच अतिवृष्टी झाली असे शासकीय नियमानुसार ठरवण्यात येते यामुळे अनेक मंडलक्षेञात पिकांचे अतिपावसामुळे नुकसान होऊनही तेथील पिकांचे पंचनामे होणार नसल्याने शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना ई-मेल पाठवून अतिवृष्टी निश्र्चित करण्याच्या नियमांत बदल करून , सरसकट नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.
        महाराष्ट्रात मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे.तसा तो पारनेर तालुक्यात देखील झालेला असल्याने या पावसामुळे खरिप हंगामातील मुग ,  सोयाबीन ,वाटाणा , वाल , तुर , बट्टाटा , बाजरी , कांदे , टोमॅटो , वांगी , कोबी , फ्लाॅवर , भेंडी , दोडके , कारली , फुलशेती , मका , कांदा रोपे तसेच सर्वच चारा पिके ७० % उध्दवस्त झालेली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २२ सप्टेंबर रोजी ६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे ३३ % पेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासकीय यंञणेला दिलेले आहेत.परंतु या आदेशाची अंमलबजावणी करत असताना मंडलनिहाय पर्जन्यमान अहवालानुसार तसेच अतिवृष्टीच्या नियमानुसारच पंचनामे करावेत असे म्हटले आहे. शासनाच्या नियमानुसार ६५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस एका दिवसात ज्या मंडलक्षेञात पडला असेल त्या मंडलात अतिवृष्टी झाली असे मानले जाते. यामुळे अतिवृष्टी ठरविण्याचा नियमच आता तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरत आहे. कारण तालुक्यात पारनेर , सुपा , निघोज , वाडेगव्हाण , वडझिरे , भाळवणी , टाकळी ढोकेश्वर , पळशी असे आठ महसुल मंडले आहेत.या मंडलांपैकी फक्त पळशी मंडलातच २० सप्टेंबर रोजी ६९.५ % मि.मि.पाऊस झालेला असल्याने शासनाच्या अतिवृष्टीच्या व्याख्येत पळशी हे एकमेव मंडलच बसत असुन , बाकी मंडले हि अतिवृष्टीच्या नियमांत बसत नाहीत.त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे हे फक्त पळशी मंडलातंर्गत येणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांचेच होणार असल्याने तालुक्यातील अन्य शेतकरी वर्गात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.याच पार्श्वभूमीवर शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना ई-मेल पाठवून अतिवृष्टी निश्र्चित करण्याच्या नियमांत बदल करण्याची विनंती केली आहे.त्यांनी निवेदनात म्हटले आहे की , एकाच दिवशी ६५ % मि.मि.पाऊस जरी काहि मंडलात पडला नसला तरी सहा , सात दिवस सातत्याने संततधार सुरूच राहिल्याने शेतकऱ्यांची पिके उध्दवस्त झालेली आहेत.तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अद्यापही पाणी भरलेलेच असल्याने त्यांचे पुढील पिक घेण्याचे नियोजन देखील कोलमडून गेलेले आहे. आधीच खरिप हंगामातील पिकांच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांनी कर्ज भांडवल गुंतवलेले होते ते हि नैसर्गिक संकटामुळे परत मिळु शकले नाही आणि पुन्हा नव्याने पुढील पिकांचे नियोजन शेतकऱ्यांना करावे लागणार असुन , त्या करिता त्याच्याकडे भांडवल देखील उपलब्ध नाही  त्यामुळे सरसकट नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आपल्या सरकारने दिलासा द्यावा असे अनिल देठे यांनी म्हटले आहे.

 तालुक्यात अनेक भागांमध्ये पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अद्यापही अनेक शेतमाल पाण्याखाली आहेत परंतु शासनाच्या निकषामुळे या शेतकऱ्यांचे पंचनामे होणार नाहीत यामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसान भरपाई ची हमी सरकार नाहीतर मग देणार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.