Breaking News

महिला नेत्याच्या कपड्यांवर हात टाकण्याची पुरुष पोलिसाची हिम्मतच कशी झाली? - चित्रा वाघ संतापल्या नवी दिल्ली -राहुल गांधी, प्रियंका गांधी व काँग्रेस कार्यकर्ते काल हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघाले असता त्यांना दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर रोखण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्याला पुढे जाऊ देण्याची मागणी केल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला होता.

दरम्यान, यावेळीचा एक फोटो कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून यात एक पुरुष पोलीस अधिकारी प्रियंका गांधींनी परिधान केलेल्या वस्त्राला पकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एका महिला नेत्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या वर्तनावरून अनेकांनी योगी सरकारला धारेवर धरले आहे.

अशातच आता भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रियांका गांधींची कॉलर पकडल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत यूपी पोलिसांवर संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ

महिला नेत्याच्या कपड्यांवर हात टाकण्याची पुरुष पोलिसाची हिम्मतच कशी झाली. युपी पोलिसांना त्यांच्या मर्यादा समजायला हव्या. भारतीय संस्कृतीवर विश्वास ठेवणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशा पोलिसांवर कारवाई करावी .

यापूर्वी राहुल गांधी यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही युपी पोलिसांनी कॉलर पकडली होती. अशातच आता प्रियांका गांधींची कॉलर पकडल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.