Breaking News

नाही तर उसाच्या फडातून कामगार बाहेर काढेन!

- भाजप नेत्या पंकजा मुंडे-पालवेंचा इशारा

- सरकारच्या चांगल्या कामांचे कौतुकच; मागण्यांसाठी मात्र रस्त्यावर उतरेल
- सावरगावातील यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन

बीड/ जिल्हा प्रतिनिधी

कुणीतरी म्हटले की उसतोड कामगारांचे निर्णय मुंबईत बसून होत नसतात. मग उसतोड कामगारांचे निर्णय धाब्यावर बसून होतात का? पंकजा मुंडेंच्या विरोधात स्टेटमेंट केले की हेडलाईन होते. मुंडेसाहेब साखर कारखानदार होते ते पण ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करायचे. लवाद नको असे कोण मागणी करतेय. शरद पवारांनी आता पुढची बोली करावी. ऊसतोड कामगार स्वाभिमानी आहेत. २७ तारखेच्या बैठकीत जो निर्णय होईल ते जाहीर करा नाहीतर उसाच्या फडातून कामगार बाहेर आणू, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने सावरगावच्या भगवान भक्ती गडावर पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी निवडणुकीत पराभूत झाले माझ्या पेक्षा कार्यकर्ते जास्त खचले. रस्त्यावर कसे उतरायचे हे आम्हाला चांगले माहीत आहे. ऊसतोड कामगारांचा मेळावा हा एका राजकीय पक्षाचा कसा काय? असे म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली.  त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंनी १० हजार कोटींचे पॅकेज घोषित केले. मी त्यांचे स्वागत करते. मात्र शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी हे पॅकेज पुरेसे नाही. शेतकर्‍यांचे अत्यंत हाल झाले आहेत. शेतकर्‍यांसाठी योग्य निर्णय घ्यावा अन्यथा विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरावे लागेल. पंकजाताई आता घरा बाहेर येणार नाहीत अशा चर्चा करत होते. मला येण्यासाठी कोरोनामुळे परवानगी मिळाली नाही. मुंडेसाहेबांचे दर्शन मी ऑनलाईन घेतले. मात्र भगवान बाबांच्या दर्शनाशिवाय दसरा मेळावा होऊच शकत नाही. तुम्ही आलातच मीही रिस्क घेतली. मीही मास्क काढून टाकला. मी शेतकर्‍यांच्या बांधावर गेले. कुणी फुलांनी स्वागत केले, कुणी अश्रुंनी स्वागत केले. माझ्या दारासमोरची गर्दी कधी कमी होऊ देऊ नको, अशी मागणी देवाजवळ केली असल्याचेही पंकजा म्हणाल्या.

मी घर बदलणार नाही, आहे तिथेच आहे;
पंकजा मुंडेंकडून पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम

मी घर बदलणार नाही आहे तिथे आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगड येथील दसरा मेळाव्यात बोलताना पक्षांतरांच्या चर्चांना पूर्णविराम दिला. आता राष्ट्रीय मंत्री झाली आहे. पक्षाच काम देशाच्या पातळीवर करणार असल्याचे पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात स्पष्ट केले. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर पंकजा मुंडेंनी शिवेसेनेत प्रवेश करावा, असे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटले होते. त्याला पंकजांनी उत्तर दिले.

साखर संघाच्या बैठकीत शरद पवार असतील तरच चर्चा करु : सुरेश धस
साखर संघाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना घेऊन चर्चा करावी. शरद पवार जाणते आहेत. जोपर्यंत बैठक होणार नाही, तोपर्यंत संप सुरुच राहणार, असा इशारा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिला. जर बैठकीत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन करु, असेही सुरेश धस म्हणाले.