Breaking News

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही : शरद पवार

- केंद्राने राज्याची देणी दिली असती तर कर्ज काढण्याची गरज पडली नसती - ठाकरेसोलापूर/औरंगाबाद : खास प्रतिनिधी

राज्यात अतिवृष्टीने झालेले नुकसान मोठे आहे. हा आर्थिक भार राज्याला झेपणार नाही. त्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागावी लागेल. केंद्राने मदत दिली नाही तर कर्ज काढून शेतकर्‍यांना मदत देऊ; पण शेतकरी वार्‍यावर सोडणार नाही. शेतकर्‍यांनीही खचून न जाता धीर धरावा, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी केले. मुख्यमंत्री ठाकरे सोमवारी सोलापूर जिल्हा दौर्‍यावर होते. तर पवारांनी मराठवाड्यातील नुकसानीचा आढावा घेतला. पवार व ठाकरे शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन बळिराजाला दिलासा देत असल्याने शेतकर्‍यांना धीर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी 11 शेतकर्‍यांना ऑन दी स्पॉट प्रत्येकी 25 हजार रुपये मदतीचे धनादेश देऊन मदतीचा प्रारंभही केला. 


राज्यावर अस्मानी संकट कोसळले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाही, अशी टीका विरोधकांनी केली होती. पण, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले व तातडीने मदतकार्य करण्यास सुरुवातही केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी  पूरग्रस्तांना  प्रातिनिधिक स्वरूपात मदत म्हणून 11 धनादेशांचे वाटप केले आहे. पडझड झालेल्या प्रत्येक घराला 95 हजारांची मदत देण्यात आली आहे. पूरग्रस्त भागातील मदतकार्य तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी तात्काळ आवश्यक ते पंचनामे कागदपत्रांच्या फारशी शहानिशा न करता पूर्ण करण्याचे आदेश आधीच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मराठवाडा दौर्‍यावर होते. सोमवारी त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी केली. याप्रसंगी ते म्हणाले, की महाराष्ट्र मोठ्या संकटाला समोर जात आहे.  काही ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍याला संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्ज काढावे लागणार आहे. केंद्र सरकारनेही राज्याला मदत करण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर मदत करण्यासाठी आश्‍वासन दिले आहे, असेही पवारांनी सांगितले. पीक पाहणी पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय मदत जाहीर करता येत नाहीत. ती प्रकिया पार पडल्याशिवाय मदत नाही. पाण्यात वाहून गेलेल्या सोयाबीनला नियमात तरतूद नाही, ती करण्याची मागणी आम्हाला करावी लागणार आहे. जनावर वाहून गेली, गाव पातळीवर रस्ते खराब झाले यात मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे, असेही पवारांनी सांगितले.

--

स्वाभिमान शिल्लक असेल तर राज्यपालांनी राजीनामा द्यावा : पवार

थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्या पदावर रहायचे की नाही याचा निर्णय घेतील. असे वक्तव्य करत कोश्यारी यांनी आता राजीनामा द्यावा, असेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सूचित केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रातील भाषेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्याचा आधार घेत पवार यांनी कोश्यारी यांना लक्ष्य केले.

--

केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारने मदत जाहीर करावी : देवेंद्र फडणवीस

बारामती : शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारने शेतकर्‍यांना तातडीने मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करणारच आहे. परंतु केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्याच्या सरकारने मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. बारामतीपासून आपल्या दौर्‍याला त्यांनी प्रारंभ केला.

--------------------