Breaking News

चंद्रकांत दादांची मर्यादा चॉकलेट ते कुल्फीपर्यंतच!

 - एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटलांना दाखवली लायकी


नाशिक/ प्रतिनिधी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटलांची मर्यादा चॉकलेट ते कुल्फीपर्यंतच आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर चंद्रकांत दादांचे नाव महाराष्ट्राला कळले. एकदाही आमच्या आंदोलनात किंवा जेलमध्ये मी दादांना पाहिले नाही. त्यांना फार सीरियसली घेऊ नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर टीका करणार्‍या चंद्रकांत पाटलांना लायकी दाखवली. 

एकनाथ खडसे म्हणाले की, मला पक्ष न सोडण्यासाठी कोणीही फोन केला नाही. फक्त चंद्रकांत दादांनी फोन केला होता. अन्यथा कोणालाही माझी गरज नव्हती. साधा संघटन मंत्र्यांचाही फोन आला नाही, तो आला असता तर मी किमान फेरविचार केला असता. आता भाजपमध्ये यूझ अ‍ॅन्ड थ्रोची पद्धत आहे, असे खडसे म्हणाले. कोणत्याही पक्षात स्पष्ट दिशा ठरलेली असते. संघटनात्मक विस्तार हे माझे यापुढचे ध्येय असेल, असे खडसे म्हणाले. राष्ट्रवादीसाठी खान्देशात काम करणे माझ्यासाठी मोठे आव्हान नाही. आमच्या भागात नाथाभाऊ म्हणून 70 ते 80 टक्के मते मिळत होती, भाजप किंवा राष्ट्रवादीचा म्हणून नाही.  12 ते 15 माजी आमदार माझ्या संपर्कात आहेत, ते लवकरच राष्ट्रवादीत येतील, असेही खडसे म्हणाले.

भाजपात बहुजन चेहर्‍याची वाणवा!

सत्तेत असेल तिथे कार्यकर्ता वळतो अन्यथा पळतो. कार्यकर्ते थोपवण्यासाठी आपले सरकार येणार असे सारखे सांगितले जात आहे. सत्तेत येण्यासाठी किमान 40 आमदारांची भाजपला गरज आहे, एक पूर्ण पक्ष जण्याशिवाय भाजप सत्तेत येत नाही. सध्यातरी मला सत्ता कोसळण्याची स्थिती वाटत नाही, असेही खडसे म्हणाले. पूर्वी मारवाडी, ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिनवले जायचे. आता बहुजन चेहर्‍यांची पुन्हा  पक्षात वाणवा आहे. आजही प्रशासनात माझ्या शब्दाला मोल आहे, त्यामुळे मंत्री बनण्याचा मला अट्टाहास नाही. कुठलीही तडजोड केलेली नाही, असे ते म्हणाले.