Breaking News

उसतोड कामगारांचा संप मागे!

उसतोड कामगारांना मजुरीत सरासरी 14 टक्के वाढ


पुणे/ विशेष प्रतिनिधी

उसतोड कामगारांचा संप मागे घेण्यात आला आहे. तर दिवसभर झालेल्या चर्चेनंतर उसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी 14 टक्के दरवाढ देण्यात आली आहे. प्रतिटन 35 ते 40 रुपयांची वाढ मिळाली आहे. साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी ही माहिती दिली.

पुण्यात उसतोड मजुरांच्या प्रश्‍नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, सुरेश धस हे सर्वजण उपस्थित होते. यावेळी राज्यातील ऊस तोडणी आणि ऊस वाहतूकदारांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उसतोड कामगारांना 14 टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच 35 ते 40 रुपये उसतोड कामगांना जास्त मिळतील. यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना 300 ते 359 कोटी रुपये त्यासाठी द्यावे लागणार आहे, अशी माहिती साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली. यावेळी सुरेश धस म्हणाले की, उसतोड मजुरांच्या प्रश्‍नावर पुण्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तसेच शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांनी आजवर झालेल्या बैठकीत बोलवले आहे. समस्या समजून घेतले असून कधीही अन्याय केला नाही. मात्र आज बैठकी पूर्वी बोलवले नसल्याने मला आंदोलन करावे लागले. त्यानंतर अखेर बैठकीला बोलविण्यात आले. त्यामध्ये उस तोड मजुरांच्या समस्या मांडल्या.

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार : धनंजय मुंडे

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबवण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बुद्रुक येथे आयोजित बैठकीत धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने महामंडळाला बळकटी देण्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपायोजना याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले.