Breaking News

एक राजा बिनडोक; त्याला खासदार कसे केले?

- नामोल्लेख टाळून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची छत्रपती उदयनराजेंवर टीका
- छत्रपती संभाजीराजेंनाही फटकारले
- 10 ऑक्टोबरच्या मराठा समाजाच्या बंदला वंचित आघाडीचा पाठिंब


पुणे/ विशेष प्रतिनिधी
 वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा उल्लेख बिनडोक असा केला. मराठा आरक्षण मुद्द्यावरुन घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा असल्याचे माझ्या वाचनात नाही. एक राजा तर बिनडोक आहे. संभाजी राजे इतर विषयात जास्त लक्ष देतात, अशी टीका आंबेडकरांनी केली. उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून उल्लेख करताना त्यांना खासदार कसे केले? असा सवालही आंबेडकरांनी उपस्थित केला. तसेच, 10 ऑक्टोबरच्या मराठा समाजाच्या बंदला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मी कुणाला अंगावर घ्यायला घाबरत नाही. उदयनराजेंना भाजपने खासदार कसे बनवले, असा मला प्रश्‍न पडल्याचे सांगून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, की मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी संपर्क साधला आणि 10 तारखेच्या मोर्चाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. वंचित बहुजन आघाडीने आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे 10 तारखेच्या बंद ला ही पाठिंबा असल्याचे आंबेडकर म्हणाले. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षण ला धक्का लागता कामा नये, असेही आंबेडकर म्हणाले. आरक्षणाच्या विषयाला फाटे फोडण्याचे काम सुरू आहे. यातून महाराष्ट्राचे सामंजस्य बिघडत असल्याचे चित्र आहे. ते बिघडू नये, असेही त्यांनी सांगितले. दोन्ही राजांचा 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा आहे; असे मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती हे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत. ज्या व्यक्तीला घटना माहीत नाही, जो व्यक्ती असे म्हणतो की आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर कोणालाच मिळू नये याला भाजपने राज्यसभेवर कसे पाठवले याचे आश्‍चर्य आहे. मी कोणालाही अंगावर घ्यायला घाबरत नाही, असेही आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले. 

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्यावर केलेल्या टिकेबाबत बोलताना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ही टीका निंदनीय असल्याचे आणि अशा प्रकारची टीका कदापि सहन करणार नसल्याचे सांगितले.