Breaking News

केमिकल कंपनीत स्फोट; जीवितहानी टळली

 


कुरकुंभ- स्फोट आणि आगीच्या तोंडावर असलेल्या कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहतीमधील शिवशक्‍ती ऑक्‍सलेट प्रा. लि कंपनीत शॉर्टसर्किट झाल्यामुळे सॉलव्हटं मिश्रित केमिलकला आग लागून स्फोट झाला. कंपनीत काम करणाऱ्या 10 ते 12 कामगारांना बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे, मध्यरात्री ही आग लागल्याने परिसरात आगीचे लोटच्या लोट पसरले होते.

आग विझविण्यासाठी कुरकुंभ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या, बारामती एमआयडीसीची एक गाडी, दौंड नगरपालिका तसेच औद्योगिक वसाहतील एका कंपनीची गाडी अशा एकूण पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून ही आग तब्बल चार तासांनी आटोक्‍यात आणली. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपन्यांची संख्या लक्षणीय आहे.

औद्योगिक वसाहतीत आगीचे सत्र सुरूच असल्याने सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले की, कंपनीमध्ये जीवितहानी झाली नाही. स्फोटामुळे गावाला तसेच इतरांना कोणताही धोका नाही. कंपनीमधील सॉलव्हटं शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली आहे, असे त्यांनी सांगितले.