Breaking News

जम्मू-काश्मीरमध्ये आता कोणालाही जमीन खरेदी करता येणार

 - केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय


नवी दिल्ली/ प्रतिनिधी

अनेक घडामोडींचे केंद्र असणार्‍या, राजकीय, भौगोलिक दृष्ट्याही महत्त्वाच्या असणार्‍या जम्मू- काश्मीर भागाच्या अनुषंगाने केंद्राकडून महत्त्वाचा निर्णय लागू करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना मंगळवारी जारी केली. ज्यामध्ये आता जम्मू, काश्मीर व लडाखमध्ये कुणालाही जमीन खरेदी करता येणार आहे.

केंद्राच्या नव्या आणि तितक्याच महत्त्वाच्या निर्णयानुसार यापुढे देशातील कोणत्याही व्यक्तीला जम्मू- काश्मीर आणि लडाख भागात जमीन खरेदी करुन तेथे स्थायिक होता येणार आहे. पण, शेतजमिनीवर असणारी बंदी मात्र येथे कायम ठेवण्यात आली आहे. जम्मू व काश्मीर पुनर्गठन अधिनियमाअंतर्गत हा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला. ज्याअंतर्गत येथे जमीन खरेदी करणार्‍या भारतीय व्यक्तीला स्थानिक असल्याचा पुरावा देणे अपेक्षित नसेल.  जम्मू व काश्मीरमध्ये नव्याने बाहेरील उद्योग सुरु करुन या भागातील गुंतवणुकीला वाव देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, येथील शेतजमिनीचा भाग हा फक्त स्थानिकांसाठीच असणार आहे. यापूर्वी फक्त स्थानिक जनताच येथे जमीन खरेदी करु शकत होती. पण, आता मात्र परराज्यातील नागरिकही जमीन खरेदी करुन येथे त्यांच्या उद्योग, व्यवसाय सुरु करु शकतात.