Breaking News

दिशा सालियनवर बलात्कार, मुख्यमंत्र्यांचा पुत्र गजाआड जाईल : राणे

- दसरा मेळाव्यातील टीका जिव्हारी लागली

- बाळासाहेबांमुळे मी आतापर्यंत शांत; दादागिरी केली तर सगळं बाहेर काढेन!

- पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही!


मुंबई/ खास प्रतिनिधी 

कुणाला बेडूक म्हणताय? आम्ही वाघ होतो म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री केले. ते असते तर तुम्हाला कधीच मुख्यमंत्री केले नसते, असे सांगतानाच राणे कुटुंब आणि भाजपवर टीका कराल तर याद राखा. गेल्या 40 वर्षात जे पाहिले-ऐकले ते बाहेर काढेल तर पळता भुई थोडी होईल, असा दम भाजपचे नेते व खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भरला. दिशा सालियनवर बलात्कार कोणी केले आणि कोणी मारले, हे लवकरच बाहेर येईल. त्यामध्ये एक मंत्री आत जाईल तो मुख्यमंत्री पुत्र आहे, असा थेट आरोप यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केला. कालच्या दसरा मेळाव्यात ठाकरेंनी राणे कुटुंबीयांवर केलेली टीका त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडे ती नैतिकता नाही. निवडणुकीआधी भाजपसोबत युती केली. बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले. यांनी 56 आमदारांसाठी बेईमानी केली, अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला. माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या भाषणाने शैलीने विचाराने आणि कामाने आपली आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. त्याला आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपवाद आहेत. त्यांच्या कालच्या भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता, शिवराळ भाषेत ते बरळले. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाची आब राखली. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवण्याच्या लायकीचे नाहीत, असा हल्लाबोल राणे यांनी केला. कालच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही. एवढेच नव्हे तर हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठीही लायक नाही, अशी घणाघाती टीकाही भाजप नेते नारायण राणे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना बेडूक आणि बेडकाची पिल्ले, अशा अप्रत्यक्ष शब्दांत टोले लगावले होते. या टीकेला नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा अक्षरश: पाणउतारा केला.

----

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पोरं डराव डराव करत आहेत. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झालाय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

--

राणेंच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे- 

* कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले

* कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री घरात बसून?

* शेण खातो आणि गोमूत्र पितो अशी भाषा? ही कसली भाषा? निषेध करतो, ही भाषा बदलली नाही तर आमचाही तोल जाईल, मातोश्रीच्या आतल्या गोष्टी बाहेर काढेन

* सुशांतची आत्महत्या नाही, खून आहे, किती लपाल, किती वाचायचा प्रयत्न कराल, पोलिसांचा वापर करुन मुलाला वाचवले, सत्तेचा दुरुपयोग केला, दिशाचे हत्या प्रकरणही बाहेर येईल, बलात्कार कोणी केला ते समजेल.

------------------------------