Breaking News

त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन!

- एकनाथ खडसे यांचा भाजपला सूचक इशारा
- शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
- नाथाभाऊ काय चीज आहे हे महाराष्ट्राला दाखवून देऊ : शरद पवार

मुंबई/ विशेष प्रतिनिधी 

गेली 40 वर्षे भारतीय जनता पक्षाला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन, शेठजी-भटजींचा पक्ष ही भाजपची ओळख बदलवून सत्तेपर्यंत नेणारे भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. यावेळी भाजपने आपल्या मागे ईडी लावली तर आपण त्यांची सीडी बाहेर काढू, अशा शब्दांत खडसेंनी भाजपला इशारा दिला. तर नाथाभाऊ काय चीज आहे हे महाराष्ट्राला दाखवून देऊ, असे शरद पवार यांनी सांगून, आगामी राजकीय रणनीती स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 दिग्गज नेते याप्रसंगी नाथाभाऊंच्या स्वागताला हजर होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाथाभाऊंचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले. 

याप्रसंगी बोलताना एकनाथ खडसे यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला. खडसे म्हणाले की, भाजप सोडण्यापूर्वी मी दिल्लीतल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बातचित केली. परंतु ते मला म्हणाले की, तुम्हाला आता पक्षात संधी नाही. तुम्ही राष्ट्रवादीत जा. त्यानंतर मी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला प्रवेश दिला त्यासाठी मी शरद पवार यांचा आभारी आहे. आयुष्यातील जवळपास 40 वर्षे भाजपच्या उभारणीसाठी काम केले. त्यामुळे स्वाभाविक आहे जेथे 40 वर्षे राहिलो तो पक्ष एकाएकी सोडावा वाटला नाही, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मला एकदा जयंत पाटील यांनी विचारले की, तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितले की तुम्ही घेतले तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणे सुरु होते. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, अशी इशारा एकनाथ खडसे यांनी दिला. याप्रसंगी शरद पवार म्हणाले, की नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल, यात मला शंका नाही, असे सांगतानाच एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाही, असे गौरोद्गार गौरोद्गार काढतानाच नाथाभाऊ काय चीज आहे तुम्हाला दाखवून देऊ, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित नव्हते.

तब्बल 72 नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

एकनाथ खडसे यांच्यासोबत नंदुरबार- तळोदाचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे - खेवलकर, बोदवडचे कृषी उत्पन्न बाजार सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्षा मंदाताई खडसे, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे अशा 72 नेत्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.

मंत्रिमंडळात बदल नाही : पवार

भाजप पक्षात तब्बल 40 वर्षे राजकीय नेतृत्त्व करणार्‍या एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्याने मंत्रिमंडळात बदल होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशामुळे मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, याबाबत ज्या माध्यमांनी बातम्या चालल्या त्या चुकीच्या असल्याचेही शरद पवार म्हणाले. अजित पवार हे नाराज असल्याची चर्चादेखील पवारांनी फेटाळून लावली.