Breaking News

शाळा बंद असूनदेखील इतर शुल्क पालकांच्या माथी!

- गॅलक्सी नॅशनल स्कूलच्या प्रवेशद्वारासमोर पालकांची निदर्शने

- कोरोनाकाळात फक्त ऑलनाईन ट्युशन फी आकारण्याची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद असून, सध्या शाळेच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र शाळेकडून इतर ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली अवाजवी फी ची मागणी केली जात असल्याच्या निषेधार्थ गॅलक्सी नॅशनल स्कूलच्या प्रवेशद्वारासमोर पालकांनी निदर्शने केली. तर कोरोनाच्या संकटकाळात ज्या सुविधा शाळेकडून दिल्या जात नाही त्याचे शुल्क न आकारता फक्त ऑलनाईन ट्युशन फी आकारण्याची मागणी करण्यात आली. 

यावेळी तक्रारदार पालक वैभव भोराडे, रामेश बेलकर, आदीनाथ गिते, गोरक्षनाथ सातपुते, गणेश सांगळे, रामदास ससे, मनीष साळवी, रिझवान शेख, संतोष वारुळे आदि उपस्थित होते. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शहरातील गॅलक्सी नॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. तर शाळेच्या इतर ऍक्टिव्हिटीज पूर्णपणे बंद आहे. शाळेमधून फी भरण्यासाठी वारंवार फोन किंवा मेसेज येत असून, दि. 5 नोव्हेंबर पर्यंत पैसे भरले नाही तर ऑनलाइन शिक्षण बंद होईल, असे सांगण्यात येत आहे. पालकांकडे शुल्क भरण्यासाठी तगादा सुरु आहे. शालेय फी मध्ये शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा पगार, शाळेचा मेन्टेनन्स खर्च, खेळाच्या साहित्याची फी आदि इतर ऍक्टिव्हिटीजच्या शुल्काचा समावेश आहे. कोरोनामुळे सर्व पालकांची आर्थिक स्थिती बिकट असून, पालक शाळेची संपूर्ण फी भरण्याच्या मानसिक स्थितीमध्ये नाही. शाळेने इतर ऍक्टिव्हिटीजचे शुल्क पालकांवर लादू नये. पालकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी. यावर्षी शाळेने फक्त ऑनलाईन ट्युशन फी घ्यावी ज्या सुविधा शाळा देत नाहीत या सुविधेची फी त्यांनी आकारु नये, असे तक्रारदार पालक वैभव बोराडे यांनी निवेदनात म्हंटले आहे. सदर निवेदन शाळेच्या प्राचार्यांना देऊन यासंबंधी चर्चा करण्यात आली.

------------