Breaking News

अखेर खडसे राष्ट्रवादीत!

- शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशमुंबई / प्रतिनिधी

गेल्या चार दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपचे माजी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश केला.  एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांची सुकन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश झाला. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव अजित पवार या सोहळ्याला उपस्थित नव्हते.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशासाठी गुरुवारीच विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यादेखील होत्या. रोहिणी खडसे यांनीही आपण भाजपामधून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले असून, राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचे सांगितले होते. खडसे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या समर्थक नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशाने जिल्हा सहकारी बँक, दूध संघ या संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.  एकनाथ खडसे यांनी बुधवारी 21 ऑक्टोबर 2020 रोजी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. आपल्या मनोगतातून त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली.