Breaking News

एनडीएच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, लोजप बाहेर, भाजप आणि जेडीयूला किती जागा?

 पाटणा : बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 3 टप्प्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. एकिकडे महायुतीने शुक्रवारी मित्र पक्षांसोबतच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाला आहे, तर दुसरीकडे एनडीएने देखील आपल्या जागावाटपाचा फॉर्म्युला घोषित केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजप बिहारमध्ये 50-50 फॉर्म्युल्याचा वापर करणार आहेत. यानुसार भाजपच्या जागांमध्ये वाढ होऊन भाजप निम्म्या विधानसभा जागांवर आपली ताकद आजमावणार आहे.

बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत. जदयू आणि भाजप 119 -119 जागांवर आपले उमेदवार उतरवणार आहेत. इतर 5 जागा जीतनराम मांझी यांच्या 'हम' पक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशीरा झालेल्या भाजप आणि जदयूच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. लोजपला यातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. एनडीएच्या जागावाटपात भाजपने सातत्याने आपल्या जागेंच्या मागणीसाठी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे भाजपला फायदा होऊन जनता दला इतक्याच जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान, नितीश कुमार यांचा जनता दल पक्ष भाजपपेक्षा जवळपास 15 ते 20 जागा अधिक लढण्याची मागणी करत होता. मात्र, भाजप जागांच्या समान वाटपावर अडून राहिल्याने हा जागावाटपाचा निर्णय बराच लांबला. अखेर मॅरेथॉन मीटिंगनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भूपेंद्र यादव दिल्लीसाठी रवाना झाले.

जदयू आणि भाजप नेत्यांमध्ये 5 तास बैठक

भाजपच्यावतीने बिहार निवडणुकीतील जागा वाटपात देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्त्व केलं. जनता दलाकडून ललन सिंह, आरसीपी सिंह आणि विजेंद्र यादव यांनी नेतृत्त्व केलं. या चर्चेत लोजपला बाजूला ठेवण्यात आलं. लोजपचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे जनता दलाने लोजपच्या एनडीएतील समावेशाला मान्यता दिली नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतही भाजप आणि जनता दलात 50-50 चाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता. बिहारमधील एकूण 40 लोकसभा जागांपैकी भाजप आणि जनता दलाने 17-17 जागा लढवल्या होत्या. तसेच 6 जागा लोजपसाठी सोडण्यात आल्या.

बिहारमध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. पहिल्या फेरीतील मतदान 28 ऑक्टोबर, दूसरे 3 नोव्हेंबर आणि तिसरे 7 नोव्हेंबरला होणार आहे. निकाल 10 नोव्हेंबरला लागणारआहे.