Breaking News

भाजपला लवकरच मोठे भगदाड!

 - हसन मुश्रीफ यांनी दिले फोडाफोडीचे संकेत

- खडसे सिर्फ झांकी है; दक्षिण महाराष्ट्रातही खळबळ असल्याचा दावा


कोल्हापूर/प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना भाजपमधून फोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेत असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजप व अन्य पक्षांमधून आणखी फोडाफोडी करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत. खडसेंचे वर्णन भाजपचा राज्यातील तगडा नेता, असे करून ते राष्ट्रवादीत येत असल्याने त्यांचे सर्व नेते मुक्तकंठाने स्वागत करत आहेत.

एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत आहे, असे नमूद करत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खास शैलीत या राजकीय घडामोडीवर भाष्य केले. दक्षिण महाराष्ट्रातही राजकीय खळबळ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रवादीतून फोडाफोडीसाठी करण्यात येणार्‍या प्रयत्नांचे वर्णन पक्ष बळकट करणे या शब्दांत करण्यात येत आहे. एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. याबाबत अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एकीकडे भाजपमधून खडसेंचा निर्णय ‘धक्कादायक’, ‘दुर्दैवी’, ‘चुकीचा’ अशा प्रतिक्रिया येत असताना महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी खडसेंचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडसेंचे स्वागत करताना भाजपला पाया ठिसूळ होतोय याचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर हसन मुश्रीफ यांनीही भाजपला झोंबणारी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है’, असे नमूद करत मुश्रीफ यांनी टोलेबाजी केली. आगामी काळात भाजपमध्ये गेलेले तसेच काठावरचे अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील, असा दावा मुश्रीफ यांनी केला. खडसेंचे पक्षात आनंदाने स्वागत करतो, त्यांच्यामुळे खान्देशात पक्षाची ताकद वाढेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

--------------------