Breaking News

गोरगरिबांना मिळाला भेंडा येथील कोविड सेंटरचा आधार!

- शासकीय दरात कोरोना रुग्णावर उपचार

- अनेक गंभीर रुग्णांना मिळाले जीवदान

- तालुक्यातील 45 डॉक्टरांनी एकत्र येऊन उभारले कोविड सेंटर

नेवासा/ तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील भेंडा येथे तालुक्यातील तब्बल 45 डॉक्टरांनी एकत्र येत उभारलेल्या कोविड सेंटरचा तालुक्यातील गोरगरिब रुग्णांना मोठा लाभ झाला आहे. या कोविड सेंटरमुळे अनेक गंभीर कोरोना रुग्णांना जीवदान मिळाले. राज्य सरकारने ठरवून दिलेल्या शासकीय दरात येथे रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती डॉ. अविनाश काळे यांनी दैनिक लोकमंथनशी बोलताना दिली.

नेवासा-नगर जिल्ह्यासह इतर बाहेरच्या ठिकाणी कोविड रुग्णांची बेडअभावी होणारी हेळसांड लक्षात घेता, नेवासा तालुक्यातील जनतेसाठी तालुक्यातीलच 45 डॉक्टरांनी एकत्रित येऊन सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा दरात भेंडा येथे सर्वसुविधासह सुसज्ज नेवासा तालुका डॉक्टर्स कोविड हॉस्पिटल या नावाने कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. भेंडा येथील संत नागेबाबा भक्त निवासात हे कोविड सेंटर चालवले जात आहे. येथे बेडसह मुबलक पाणी, प्रसाधनगृह, ऑक्सिजन आदींची सुविधा करण्यात आली असून, या सेंटरचे मुख्य प्रवर्तक असलेले नेवासाफाटा येथील श्‍वास हॉस्पिटलचे प्रमुख हदयरोग तज्ञ डॉ. अविनाश काळे पाटील यांच्या नेतृत्वात हे कोविड सेंटर चालवले जात आहे. त्यांच्याच संकल्पनेतून व नेवासा येथील डॉ. शंकरराव शिंदे, लक्ष्मी क्लिनिक व समर्पण फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. करणसिंह घुले, डॉ. विजयकुमार मुळे, डॉ.रविंद्र दरंदले, डॉ.भारत मरकड, डॉ.संजय भदगले, डॉ.वाल्मिक तुवर, डॉ.किशोर लांडे, डॉ.संतोष ढवाण, डॉ.सचिन साळुंके, डॉ. प्रणव जोशी, डॉ.शिवराज गुंजाळ, डॉ.विनय छनाली, डॉ.शिवतेज दारुंटे यांच्यासह पंचेचाळीस डॉक्टरांनी एकत्र येऊन आपली जबाबदारी वाटून घेतली आहे. राज्य सरकारने ठरवून दिलेल्या शासकीय दरात येथील कोरोना रुग्णावर उपचार केले जात असून, त्यामुळे तालुक्यासह शेजारील बीड, औरंगाबाद, नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णही येथे उपचारासाठी येत आहेत. सुमारे पन्नास बेडसह व्हेंटिलेटर, ऑक्सिजन लाईन व इतर सुविधा येथे उपलब्ध आहेत. तसेच चोवीस तांस डॉक्टर आपली सेवा देत आहेत. या नेवासा तालुका डॉक्टर्स कोविड हॉस्पिटलमध्ये दहा बेड आय सी यू, तर पन्नास सुसज्ज बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तर रुग्णांच्या सेवेसाठी वेलट्रेन नर्सिंग स्टाफ, ए.सी.रूम, व्हेंटिलेटर्स, बायपॅप या सुविधां बरोबर आहार मार्गदर्शन, आयुर्वेदा चार्‍यांची व्हिजिट व त्यांच्या मार्फत प्राणायाम व योगाचे धडे ही दिले जात आहेत. रुग्णांच्या जेवणाची तर संशयित रुग्णांची ही वेगळी व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये केली गेली आहे. नेवासा तालुक्यासाठी संत नागेबाबा भक्त निवास हे अल्पशा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. अविनाश काळे व डॉ. शंकरराव शिंदे यांनी नागेबाबा परिवाराचे प्रमुख कडूबाळ काळे यांना धन्यवाद दिले.

--

योग्य उपचार व दक्षता घेतली तर रुग्ण बरा होतो - डॉ. काळे

कोरोनाबाबत सद्याची परिस्थिती सर्वत्र बिकट स्वरूपाची असून, आतापर्यंत नगर - औरंगाबाद व इतर ठिकाणची सर्व हॉस्पिटल बेड नसल्याने फुल्ल झाली आहे. पैसा असून ही कोविड रुग्णांना उपचार घेता येत नाही, कोविड रुग्णांना हालअपेष्टा सहन करत येणार्‍या विविध समस्याना ही सामोरे जावे लागत आहे, बेड उपलब्ध नसल्याने तर काही ठिकाणी ऑक्सिजनची समस्या उदभवत असल्याने रुग्ण दगवतांना दिसत आहे. ही भयावह परिस्थिती लक्षात घेता नेवासा तालुक्यातील तज्ञ डॉक्टरांनी एकत्रित येत नेवासा तालुक्यातील जनतेसाठी अल्पदरात परवडेल व उपचार होईल, असे हे कोविड सेंटर व हॉस्पिटल उभे केले आहे. आजपर्यंत शेकडो रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेल्याचे आम्हाला समाधान आहे. कोरोना हा जीवघेणा आजार असला तरी वेळीच उपचार व योग्य ती खबरदारी घेतली तर त्यावर मात करता येते, असे डॉ. अविनाश काळे यांनी सांगितले आहे.