Breaking News

पडळकर-रोहित पवारांमध्ये जुंपली

 - सोशल मीडियावरून आरोप-प्रत्यारोप


नगर/सांगली/ प्रतिनिधी

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्जत मतदार संघातील खराब रस्त्यावरुन आमदार रोहित पवार यांना लक्ष्य केले. खराब रस्त्यावर एक व्हिडीओ करत तो पडळकर यांनी ट्विट केला. यासोबत रोहित पवार यांच्यावर वैयक्तिक टीकादेखील केली. पडळकर यांनी ट्विट केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आणि पडळकर यांनी केलेल्या आरोपाला आमदार रोहित पवार यांनी काही तासातच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिले. यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या या दोन युवा आमदारात चांगलीच जुंपल्याचे दिसून आले.

शरद पवार यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे, असा आभास झालेल्या रोहित पवार यांनी खांद्यावरुन खाली मतदार संघात उतरावे व मतदार संघातील कामावर लक्ष द्यावे. मोदी साहेब व फडणवीस साहेबांना सल्ले देत बसू नये, असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यानी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार याच्यावर ट्वीट करत टीका केली. कर्जत मतदारसंघातील खराब रस्त्याची परिस्थिती दाखवत पडळाकर यांनी हे ट्वीट करता रोहित पवार यांना लक्ष्य केले. आमदार रोहित पवार यांनी देखील फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पडळकर यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. माझे मित्र गोपीचंद पडळकर जी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरे झाले आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात. यामुळे तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरे वाटेल. माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते.  रस्त्याचा जाब खरेतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता. राहिला प्रश्‍न साहेबांच्या खांद्यावर बसण्याचा. तर साहेब हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमानही आहे. पण मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात, असे मी विचारणार नाही, पण आतातरी आहात त्याच ठिकाणी राहिलात तरी आपल्यावरील लोकांचा विश्‍वास नक्की वाढेल, असा टोलाही पवारांनी हाणला.