सोलापूर : माढा रस्त्यालगत असलेले बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहायाने जाळून चोरट्यांनी 11 लाख 42 हजार रुपयांची रोकड चोरुन नेली आहे...
सोलापूर : माढा रस्त्यालगत असलेले बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहायाने जाळून चोरट्यांनी 11 लाख 42 हजार रुपयांची रोकड चोरुन नेली आहे. याबाबत सचिन सुखदेव चौधरी (वय 30 वर्षे, रा. शिरोळे, ता बार्शी) यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हे एटीएम कुर्डूवाडी बँक शाखेचे आहे. पण, हे एटीएम सेंटर मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने या चोरीचा गुन्हा मोहोळ पोलीस ठाणे येथे दाखल झाला आहे.
चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये जाऊन गॅस कटरने लॉक कापले आणि 11 लाख 42 हजार रुपयांच्या नोटा लंपास केल्या. आजूबाजूला शुकशुकाट असल्याने कोणीही या चोरीकडे लक्ष दिले नाही. बँक ऑफ इंडिया, कुर्डवाडी शाखेच्या माढा रस्त्यालगत असलेले एटीएम फायनान्शियल सिस्टीम सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीचे आहे. तक्रारदार सचिन चौधरी हे या कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून काम करत आहेत. ते म्हणाले, सोमवारी (23 नोव्हेंबर) दुपारी 3 ते 4 च्या सुमारास रक्कम टाकणारे कर्मचारी आश्रम बेडकूते (रा. वरकुटे, ता. करमाळा), अनिल भाग्यवंत (रा.झरे ता.करमाळा) यांनी बँकेच्या कुर्डूवाडी शाखेतून 5 लाख रुपये एटीएममध्ये भरले होते. सकाळी एटीएमची स्वच्छता करण्यासाठी अरविंद जगताप (रा. कुर्डूवाडी) तेथे आल्यानंतर त्यांना या चोरीची बाब लक्षात आली. त्यांनी लगेच बँक ऑफ इंडिया कुर्डूवाडीचे शाखा प्रबंधक उदय काकपूरे यांना सांगितले. काकपूरे यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे व शाखाधिकारी काकपूरे यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांनी 2 हजार रुपयांच्या 6 नोटा, 500 रुपयांच्या 2 हजार 253 नोटा, 100 रुपयांच्या 35 नोटा चोरुन नेल्या आहेत. यामध्ये एटीएमचे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी पाहणी केली. पण, एटीएम सेंटर हे मोहोळ पोलीस ठाण्यात अंतर्गत येत असल्याने हा गुन्हा मोहोळ पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला.
------------------------------