सातारा / प्रतिनिधी : 12 वर्षांपूर्वी पाक अतिरेकी अजमल कसाब याला मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे जिवंत पकडताना शहीद झालेले पोलीस दलातील तुकाराम...
सातारा / प्रतिनिधी : 12 वर्षांपूर्वी पाक अतिरेकी अजमल कसाब याला मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे जिवंत पकडताना शहीद झालेले पोलीस दलातील तुकाराम ओंबळे यांच्या केडंबे, ता जावळी या मूळगावी स्मारकाची घोषणा करण्यात आली. परंतू गेली 12 वर्ष स्मारकाविना दरवर्षी 26/11 रोजी अभिवादन करण्यात येत आहे, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. तर प्रशासकीय अधिकार्यांनी प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी दिला असल्याची माहिती दिली.
शहीद तुकराम ओंबळे यांच्या समवेत मुंबई हल्ल्यातील शहीद वीरांना अभिवादन तसेच त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक अमोल माने, शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, सरपंच वैशाली जंगम, सपोनि रोकडे, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, पत्रकार अजित जगताप, एस. एस. पार्टे, विश्वनाथ धनवडे, मंडलाधिकारी अनीस मेमन, बंडू मुकादम, संपर्कप्रमुख नामदेव बांदल, प्रा. निकम, गणेश बोबडे, आकाश यादव व विद्यार्थी-ग्रामस्थ उपस्थित होते.
शहीद तुकाराम ओंबळे यांनी जिवंत अतिरेकी पकडून आपल शौर्य दाखवले आहे. भारत सरकारने त्यांना यासंदर्भात अशोकचक्र प्रदान करुन त्यांचा गौरव केला आहे. गुजरातमधील एका तेल विहिरीलाही त्यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच मुंबईमध्ये त्यांच्या नावाचे स्मारक आहे. एका ऐतिहासक गडाच्या बुरजालाही त्यांचे नाव देण्यात आले आहे. ही गौरवशाली बाब असली तरी त्यांच्या केडंबे या मूळ गावी निधीची तरतूद करूनही 12 वर्ष झाली स्मारक होत नाही, गावाला जाणारा रस्ता दुरुस्त होत नाही, अशी खंत ग्रामस्थांनी मांडली. शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून हा प्रश्न मार्गी लावण्याचा संकल्प शिवसेना पदाधिकार्यांनी केला आहे. वेळ पडल्यास लोकवर्गणीतून स्मारक निर्माण केले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी मान्यवरांच्या समवेत शहीद ओंबळे यांचे पुतणे स्वप्निल ओंबळे यांचे मन हेलावणारे भाषण झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तलाठी एम. आर. डोईफोडे, नेहरू युवा मंडळ व ग्रामस्थांनी सहकार्य केले. प्रास्ताविक अदिनाथ ओंबळे, सूत्रसंचालन बलवंत पाडळे व एकनाथ ओंबळे यांनी आभार मानले. प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केल्यानंतर स्मारकाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सध्या देवस्थानच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय अधिकार्यांनी तातडीने मंजुरी द्यावी व शहिदांच्या सन्मान करावा यासाठी शिवसैनिक म्हणून मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती शिवसेना पदाधिकारी एकनाथ ओंबळे यांनी देऊन शालेय साहित्य मोफत वाटप केले. यासाठी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.