Breaking News

5 वर्षांच्या चिमुकल्याच्या पोटातून काढली 3 फूट लांब गाठ; पाहून डॉक्टरही हैराण

 

 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या पोटातून काढली 3 फूट लांब गाठ; पाहून डॉक्टरही हैराण

जयपूर, 21 नोव्हेंबर : एका 5 वर्षीय मुलाच्या पोटात सतत दुखत होतं. त्याला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेलं जायचं. उपचारानंतर त्याला बरंही वाटायचं, पण त्याचं शरीर दिवसेंदिवस अशक्त होऊ लागलं होतं. पण काही दिवसांनी त्या मुलाचं ऑपरेशन झाल्यानंतर जे पाहिलं त्याने डॉक्टरही हैराण आहेत. त्या मुलाच्या पोटात सापाच्या आकारासारखा, धाग्यांनी बनलेला 3 फूट लांबीचा गुच्छाच बाहेर काढण्यात आला.

बूंदी जिल्ह्यातील हिंडोलीमध्ये राहणाऱ्या 5 वर्षाच्या मुलाला गेल्या वर्षभरापासून पोटदुखी आणि सतत ढेकर येण्याची समस्या होत होती. त्याला अनेकदा डॉक्टरांकडे नेलं जायचं. तो उपचारानंतर बराही होयचा, पण त्याची तब्येत खालवत जात होती. त्याचं खाणं-पिणंही अतिशय कमी झालं होतं.

'आजतक'ने दिलेल्या वृत्तानुसार, सततच्या त्रासानंतर मुलाच्या वडिलांनी त्याला बूंदीमधील डॉक्टर वीएन माहेश्वरी यांना दाखवलं. त्यांना तपासणीमध्ये मुलाच्या पोटात गाठीसारखं काहीतरी असल्याचं जाणवलं. त्यानंतर त्या मुलाला कोटातील बालरोग तज्ञांकडे पाठवलं. तेथील डॉक्टर समीर यांनी मुलाचं ऑपरेशन केलं आणि त्यानंतर जे समोर आलं त्याने ते हैराण आहेत. अशाप्रकारची केस वीस वर्षांत पहिल्यांदाच पाहिली असल्याचंही ते म्हणाले.

मुलाच्या पोटात सापासारख्या आकाराचा, धाग्यांचा 3 फूट लांबीचा एक गोळाच आढळला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अतिशय दुर्लभ आजार आहे. ज्याला मेडिकल भाषेत रॅपएंजेल सिन्ड्रोम (Rapunzel syndrome) म्हटलं जातं. अधिकतर केसेसमध्ये या आजाराचा रुग्ण स्वत:चे केस तोडून ते खातो. पण, हा 5 वर्षाचा मुलगा कपड्याचे धागे तोडून खात होता, जे अतिशय गंभीर आणि असामान्य असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सध्या मुलाला देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून त्याला तीन ते चार दिवसांनंतर खाणं-पिणं सुरू केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.