Breaking News

सोमवारपासून सुरु होणार नववी ते बारावीचे वर्ग, जिल्ह्यातील 5590 शिक्षकांची होणार अ‍ॅण्टीजेन टेस्ट

 


सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतचे शैक्षणिक वर्ग सुरु होणार आहेत़. त्या पार्श्वभुमीवर रत्नागिरी जिल्ह्याचा आरोग्य आणि शिक्षण विभाग सज्ज झाला आहे़ जिल्ह्यातील 5590 शिक्षकांची अ‍ॅण्टीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. ज्या शिक्षकांना मधुमेह, रक्तदाबसारखे आजार आहेत त्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनींग आणि ऑक्सिजन तपासणी करुनच प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी दिली.

22 मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यापासून कोरोनाच्या काळात शाळा महाविद्यालये बंद आहेत. राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून नववी, दहावी आणि अकरावी बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे़. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी आणि नियमांचे पालन करत हे शैक्षणिक वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. वर्गामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात येणार आहे़. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असेल त्या शाळांमध्ये सकाळ दुपारच्या सत्रात वर्ग भरतील. पहिल्या टप्प्यात गणित, विज्ञान या विषयांवर अधिक भर दिला जाणार आहे़. विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनींग आणि ऑक्सीजन लेव्हल तपासूनच प्रवेश दिला जाईल असे जि़.प़.अध्यक्ष रोहन बने यांनी सांगितले.

जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत 5590 शिक्षक आहेत़ त्या शिक्षकांची अ‍ॅण्टीजेन टेस्ट केली जाईल़. शाळेमध्ये मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे़. तसेच मुख्याध्यापकांनी शाळेत मास्क उपलब्ध करुन ठेवणे गरजेचे आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडे मास्क नसेल तर तो शाळेतून उपलब्ध व्हावा असा यामागे उददेश असल्याचे अध्यक्ष रोहन बने यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़.बबीता कमलापुरकर उपस्थित होत्या.