Breaking News

गळफास घेऊन गौरी प्रशांत गडाख यांची आत्महत्या

आत्महत्येचे कारण काय? नगर जिल्ह्यात चर्चा!

- सोनई येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
- गडाख कुटुंब पुन्हा चर्चेच्या स्थानी!


अहमदनगर/ विशेष प्रतिनिधी
राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजय, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून गौरी प्रशांत गडाख (वय ३८) यांनी शनिवारी सायंकाळी नगर येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. शवविच्छेदानाच्या प्राथमिक अहवालातून ही बाब उघड झाली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे, अशी माहिती अहमदनगरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली. गौरी यांच्यावर सोनई (ता. नेवासा) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण सोनई गावात शोक पाळण्यात आला होता. तसेच व्यापारपेठ बंद होती. या घटनेने नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली असून, विविध सामाजिक उपक्रमांत सक्रीय असलेल्या गौरीताईंनी आत्महत्या का केली? अशी चर्चा झडत आहे. पोलिस या घटनेच्या खोलात जाणार का? असाही प्रश्न उपस्थित होत होता.
नगरचे माजी खासदार, ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या सून गौरी प्रशांत गडाख यांचा शनिवारी सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला होता. खासगी रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झालेला असल्याने रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली. मृत्यूबद्दल शंका उपस्थित झाल्याने शवविच्छेदन औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सकाळी मृतदेह औरंगाबादला नेण्यात आला. नातेवाईक व पोलिसांच्या देखरेखीत शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, त्याबद्दल माहिती देताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, घाटी रुग्णालयात चार डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले. त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. गळफासामुळे गौरी यांचा मृत्यू झाल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार आता पोलिस पुढील तपास करणार आहेत. शवविच्छेदनानंतर गौरी यांच्यावर गडाख यांचे मूळ गाव असलेल्या सोनई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. गौरी यांच्या मृत्यूमुळे सोनईत हळहळ व्यक्त करण्यात येत असून, गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. गौरी यांचे माहेर लोणी (ता. राहाता) येथील असून, वसंतराव विखे यांच्या त्या कन्या होत. विखे हे भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भावकीतील आहेत. घटनेची माहिती मिळताच माहेरच्या मंडळींनी रात्रीच नगरला धाव घेतली होती. तसेच, संशयास्पद मृत्यूबाबत गडाख कुटुंबीयांना जाब विचारला होता. यासंबंधी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, यासंबंधी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. आमच्याकडे आद्याप कोणीही अधिकृतपणे तक्रार दिलेली नाही. शवविच्छेदनाचा अहवाल पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल.
--
घाटीत केले शवविच्छेदन
खासगी रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नियमानुसार याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस अधिकार्‍यांनी रुग्णालयात येऊन तपास सुरू केला होता. आत्महत्ये मागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी चर्चा मात्र विविधांगी होत आहेत. पोलिसांनी या घटनेच्या खोलात जाण्याची मागणी पुढे आली आहे. काल रात्री रुग्णालय परिसरात काहीकाळ तणावही होता. रविवारी सकाळी शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथे नेण्यात आला. तेथे घाटी शासकीय रुग्णालयात देखरेखीखाली शवपरीक्षण व विच्छेदन करण्यात आले. त्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब पुढे आली.
---------------------------