Breaking News

जवळा ग्रामस्थांना अतिक्रमण काढण्याचा अधिकार दिला कोणी? प्रशासक व ग्रामसेवक यांनी घेतली बघ्याची भूमिका.

जवळा ग्रामस्थांना अतिक्रमण काढण्याचा अधिकार दिला कोणी? प्रशासक व ग्रामसेवक यांनी घेतली बघ्याची भूमिका.
--------------
जवळे येथे ग्रामसेवकांच्या उपस्थितीत ग्रामसभा, शेकडोंच्या संख्येने लोक जमले, नियम धाब्यावर ,कोणावरही कारवाई नाही.
-----------
हातावर पोट असणाऱ्याची अतिक्रमणे काढली धनदांडग्यांचे काय?
------------
ग्रामस्थांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यापुढे आमचे काही चालू शकले नाही - प्रशासक


पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यातील जवळा येथे दि.२८ रोजी ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणे काढण्यात आली. मात्र ही अतिक्रमणे अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना न देता काढली गेली. तसेच अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामसभा बोलावण्यात आली होती. ही ग्रामसभा नसून बैठक होती व ती अनधिकृत होती अशी माहिती ग्रामविकास अधिकारी यांनी दिली आहे. मग ही ग्रामसभा कोणाच्या इशाऱ्यावर बोलवली ग्रामविकास अधिकारी व प्रशासक अद्याप गप्प का बसले. याबाबत संबंधितांवर कारवाई का झाली नाही.


जवळा येथील अतिक्रमणे ग्रामस्थांच्या दबावामुळे काढली गेली आहेत. अशी माहिती ग्रामविकास अधिकारी यांनी दिली. अतिक्रमणे  आपण काढलेली नाही असेही त्यांनी सांगितले तर अतिक्रमण काढले कोणी असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमवता येत नसतानाही ग्रामसभेचे नियोजन केले. जिल्ह्यात अद्याप कोठेही ग्रामसभा  घेण्यात आलेली नाही. तरीही जवळे येथे मोठ्या संख्येने ग्रामसभा घेण्यात आली. मात्र ही ग्रामसभा नसून बैठक होती व ती ही अनधिकृत होती असे ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले आहे. मग जर बैठक अनधिकृत होती व अतिक्रमणे काढण्याबाबत ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असेल तर अशा वेळेस ग्रामविकास अधिकारी यांनी त्वरित याबाबत वरिष्ठ प्रशासनाला माहिती कळवली का नाही. तसेच त्या ठिकाणी ग्रामस्थ वाद करण्याच्या मनस्थितीत होते असेही ग्रामविकास अधिकारी म्हणतात तर मग वाद वाढला असता व भांडणे झाली असती तर कायदा आणि सुव्यवस्था यांचाही प्रश्न निर्माण झाला असता याकडे ग्रामविकास अधिकारी यांनी दुर्लक्ष का केले. तसेच अतिक्रमण हे गरीब व हातावर पोट असणाऱ्या लोकांचे काढले धनदांडग्यांना यातून वगळण्यात आले. त्यांचे अतिक्रमणे अजूनही तशीच आहेत मग ती कधी काढणार असा सवाल ज्यांची अतिक्रमणे काढली त्यांनी उपस्थित केला आहे. 


आदल्या दिवशी लाऊडस्पीकरवर ग्रामसभा असल्याचे ग्रामस्थांना सांगण्यात आले होते असे तेथील ग्रामस्थ सांगत आहे. दुसऱ्या दिवशी ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडली मग ही ग्रामसभा नसून बैठक होती व ती अनधिकृत होती हे कसे ?
बैठकीच्या नावाखाली ग्रामसभा घेण्यात आली. मात्र अधिकृत तिला मान्यता नव्हती तरीही ग्रामस्थांच्या पुढाकाराने अतिक्रमण काढले त्यावेळेस ग्रामविकास अधिकारी तेथे उपस्थित असल्यामुळे ग्रामपंचायतीने अतिक्रमणे काढली असतील असा समज अतिक्रमण धारकांचा झाला मात्र ग्रामसेवक यांनी आपण अतिक्रमणे काढली नाही अशा प्रकारचे उत्तर दैनिक लोकमंथनशी बोलताना दिल्यानंतर संभ्रमावस्था दूर झाली. हा सगळा प्रकार होत असताना ग्रामसेवक यांनी त्वरीत वरिष्ठ प्रशासनाला का कळवले नाही. 


अशा वेळेस वाद निर्माण झाला असता तर कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्‍न उपस्थित झाला असता. याकडे ग्रामविकास अधिकारी यांनी दुर्लक्ष का केले. तसेच संबंधितांवर याबाबत गुन्हे दाखल करण्याचे धाडस ग्रामसेवकांनी का दाखवले नाही. असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
याप्रकरणी आता गटविकास अधिकारी काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे असणार आहे तसेच त्यांची सविस्तर चौकशी होऊन तसेच या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्रित आले कोरोना काळात नियंत्रण असणाऱ्या स्थानिक समितीने याकडे दुर्लक्ष का केले यामध्ये ग्रामसेवक यांचाही सहभाग असतो व त्यांनी त्वरित संबंधितांवर गुन्हे दाखल का केले नाही याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

लोक जमा झाले लोकांनी परस्पर अतिक्रमणे काढली. लोकांनी ग्रामसभा घ्यावी अशी मागणी केली होती पण नियमानुसार ग्रामसभा घेता येणार नाही असे त्यांना सांगितले होते. ज्यावेळेस अतिक्रमण काढत होते त्यावेळेस मी तिथे गेलो होतो. मात्र ग्रामस्थांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या पुढे आमचे काही चालू शकले नाही. त्यांना अतिक्रमण काढू नये असे सांगितले मात्र लोकांनी ऐकले नाही.
--------------
प्रकाश पळसे 
प्रशासक ग्रामपंचायत जवळा 

गेल्या पंधरा वर्षापासून मी गावाबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये राहत आहे . दि.२८ रोजी ग्रामसेवक शिवाजी खामकर यांनी गावातील ग्रामस्थ सोबत येऊन पूर्वसूचना न देता जेसीबीच्या साह्याने मी राहत असलेले पत्र्याचे शेड काढून टाकले. यामुळे  मुलाबाळांसह माझा संसार उघड्यावर आला आहे.
-----------
शीला वागदरे