Breaking News

आत्मनिर्भर योजनेत गोरगरीबांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करा

 

पिंपरी । प्रतिनिधी

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजना गोरगरीब नागरिकांसाठी वरदान असून त्या योजनेसाठी अनेकांनी बँकांकडे अर्ज सादर केले आहेत. परंतु असे कर्जवाटप करायला बँका तयार नसून अनेक ठिकाणी टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे अशा बँकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पुढील काळात कारवाई न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही दिनेश यादव यांनी दिला आहे.

अनेक पथ विक्रेत्यांची कर्ज प्रकरणे बँकेकडे असून सगळी पूर्तता करूनही बँका कर्ज द्यायला आडकाठी आणत आहेत. या तक्रारींवर दिनेश यादव यांनी संबंधित बँक अधिकाऱ्यांना समक्ष भेटून विनंती केली होती पण तरीही अद्याप कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आलेली नाहीत.

त्यामुळे आता महापालिकेच्या नागरवस्ती विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि बँकांना कर्जप्रकरणे मंजुरीसाठी भाग पाडावे असे पत्र दिनेश यादव यांनी विभागाला दिले आहे. संबंधित विभागाचे अधिकारी अजय चाटणकर यांनी याचा पाठपुरावा घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी पूजा आल्हाट, आणि रामकृष्ण लांडगे हे उपस्थित होते.