नाशिक ( प्रतिनिधी ) राज्यात गुटखा आणि पानमसाला विक्रीला पूर्णतः बंदी असतानाही परराज्यातून चोरी-छुपे गुटखा-तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्र...
नाशिक ( प्रतिनिधी ) राज्यात गुटखा आणि पानमसाला विक्रीला पूर्णतः बंदी असतानाही परराज्यातून चोरी-छुपे गुटखा-तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्रास सुरू असल्याचे दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातही हा धंदा तेजीत असून, नव्याने दाखल झालेले विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ प्रतापराव दिघावकर, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सूत्रे स्वीकारताच सुरू असलेली अवैध गुटखा वाहतूक आणि विक्रीसह दारू, मटका व शेतकरी फसवणुक आदीं व्यवसायात गुंतलेल्या माफियांच्या मुसक्या बांधण्यासाठी कंबर कसली. सर्व पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश देत काही विशेष पथकं तयार करून अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाने अन्न-औषध विभागाला सोबत घेऊन विविध ठिकाणी कारवाई करत लाखोंचा गुटखा-पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थाचा माल जप्त केला होता. मात्र ही कारवाई नव्याचे नऊ दिवस ठरणार की कायम स्वरूपी या अवैध व्यवसायाचे कंबरडे मोडण्यात हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी यशस्वी होणार यावर वेगवेगळे तर्क व्यक्त केले जात आहेत.जिल्ह्याच्या ग्रामिण भागात पुन्हा अवैध गुटखा विक्री जोरात सुरू झाल्याचे दिसत असल्याने या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचृ धडाडीचे प्रयत्न हाणून पाडणारी समांतर यंञणा ग्रामिण पोलीसांमध्ये उभी झाली असावी अशी शंका उपस्थित केली जात आहे.
परराज्यातून चोरी छुपे गुटखा-पानमसाला तसेच तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक महाराष्ट्रात खुलेआम सुरू आहे
अवैध गुटख्याचा धंद्यावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाला फारसे यश आले नसल्याने विविध ठिकाणी मोठ्या दुकानांपासून लहान लहान टपऱ्या पर्यत गुटख्याची विक्री जोरात सुरू आहे. किराणा दुकान पासुन तर शाळा, महाविद्यालये आणि प्रत्येक
टपऱ्यापर्यंत होलसेल दरात विक्रीस बंदी असलेला गुटखा पोहोच करणारी यंत्रणा जोमाने कार्यरत झाल्याचे दिसत आहे.
तालुक्या तालुक्यात गुटखा विक्री करणारे मोठे दहा पंधरा मोठे व्यापारी असल्याची चर्चा असून स्थानिक पोलीस प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासन या चांडाळ चौकडीकडे अर्थ पुर्ण दुर्लक्ष करीत नाही ना? अनेक दुकानांसह पान टपऱ्यांवर सुगंधी सुपारी बरोबर मिक्स नावाने गुटखासदृश पदार्थ विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.ही सांगड फोडण्यासाठी पोलीस प्रशासन लक्ष घालणार का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.