लासलगाव : राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये नवीन कांद्याची आवक वाढल्याने कांदा घसरणीचे शुक्लकाष्ठ थांबत नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. दि...
लासलगाव : राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये नवीन कांद्याची आवक वाढल्याने कांदा घसरणीचे शुक्लकाष्ठ थांबत नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. दिवाळीपूर्वी साडेसहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे विक्री झालेला कांदा साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. पुन्हा टाळेबंदीच्या होण्याच्या चर्चेची धास्ती घेऊन शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात आपला कांदा बाजार समितीत विक्रीस आणल्याने दररोज कांदा दरात घसरण होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
लाल कांदा दर 800 रुपयांनी, तर उन्हाळ 450 रुपये क्विंटलने घसरले, तर दुसरीकडे भाववाढीची शक्यता लक्षात घेऊन निर्यातीपासून साठवणुकीपर्यंत केंद्र सरकारने लागू केले. कांद्याची भाववाढ कायम राहील, या आशेवर साठवून ठेवलेला आणि नव्याने पिकविलेला कांदा कमी भावाने विकण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. पुन्हा टाळेबंदी होण्याच्या चर्चेची धास्ती घेऊन शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केल्याने 25 दिवसांत भावात तीन हजारांनी घसरण झाली. येथील मुख्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी 1100, सरासरी 3000, जास्तीत जास्त 3512 रुपये भाव मिळाला, तर लाल कांद्याला कमीत कमी 2500 सरासरी 3240 जास्तीत जास्त 4500 रुपये भाव मिळाला.
दिवाळीपूर्वी कांद्याचे भाव वाढले होते. साधारणपणे आठ ते नऊ हजार रुपये क्विंटलप्रमाणे बाजार समितीत कांद्याचे लिलाव होत होते. शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केल्याने भावात तीन ते चार हजारांनी घसरण झाल्ली आहे. दिवाळीपूर्वी कांद्याला जसा भाव होता तसाच भाव दिवाळीनंतर राहीन या आशेने अनेक शेतकर्यांनी कांदा साठवून ठेवला. दिवाळीनंतर मात्र, अचानक कांद्याचे भाव घसरले आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवून पुन्हा टाळेबंदी केली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. पहिल्या टाळेबंदीचाफटका शेती मालाला बसला होता.
हा अनुभव लक्षात घेऊन कथित टाळेबंदीच्या आधी आपला माल विकून मोकळे व्हावे, असे शेतकर्यांना वाटू लागले आहे. शिवाय वादळी पावसाची शक्यता असल्याने नुकसान टाळण्यासाठीही कांदा विक्रीला काढला आहे. चाळीत साठविलेला जुना कांदा तर बाहेर काढलाच, शिवाय नव्याने उत्पादित कांदाही लगेच बाजारात आणण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये शेकडो क्विंटल कांद्याची आवक होऊ लागली आहे. प्रत्येक बाजार समितीमध्ये शेकडो क्विंटल कांद्याची आवक होऊ लागली आहे. कांद्याचे लिलाव असलेल्या दिवशी बाजार समित्यांच्या बाहेर कांदा घेऊन आलेल्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.