Breaking News

दोन शिफ्टमध्ये भरणार शाळा!

- एका वर्गात फक्त 20 विद्यार्थीच बसणार
- दररोज चार तासच होणार अध्यापन 


पुणे/ प्रतिनिधी 

राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग असलेल्या सुमारे 35 हजार शाळांमधील 53 लाख विद्यार्थ्यांचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून भरविले जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा अवघी चार तासच असेल. सकाळी साडेसात ते साडेअकरा किंवा दुपारी दीड ते सायंकाळी साडेपाचपर्यंत तास सुरु ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. एका वर्गात अवघे 20 विद्यार्थी बसविले जाणार आहेत. 

राज्य सरकारच्या निर्णयानुसार, 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होतील. त्यावेळी मुलांच्या आरोग्याला प्राधान्य दिले जाणार असून, सकाळी आणि दुपारच्या सत्रात शाळा भरविता येतील. कोणत्या सत्रात शाळा भरवायची त्याचा अधिकार संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना असेल. राज्यात फेब्रुवारीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सावध पवित्रा घेत राज्य सरकारने नववी ते बारावीपर्यंतचेच वर्ग भरविण्याचे नियोजन केले आहे. शाळेत दाखल होणार्‍या मुलांच्या पालकांचे संमतीपत्र त्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. दुसरीकडे मुलांचे वर्ग एक दिवसाआड भरणार असून, त्यात आज शाळेत आलेल्या मुलाला दुसर्‍या दिवशी सुट्टी दिली जाणार आहे. त्यात इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांना प्राधान्य दिले जाणार आहे. शाळांमधील शिक्षक व शिक्षकतेर कर्मचार्‍यांची ’आरटीपीसीआर’ ही कोरोना टेस्ट केली जाणार असून विद्यार्थ्यांसह शिक्षक व अन्य कर्मचार्‍यांच्या तापमान व ऑक्सिजन लेव्हलची दररोज नोंद ठेवली जाणार आहे. पालकांची संमती असल्याशिवाय विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाणार नसल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

------------------------