Breaking News

जमीनींचे बलीदान देणाऱ्या बळीराजाच्या नशीबी गेल्या पन्नास वर्षात आलेले दुःख, वेदना आता मी दुर करणार आहे - आ. लंके

जमीनींचे बलीदान देणाऱ्या बळीराजाच्या नशीबी गेल्या पन्नास वर्षात आलेले दुःख, वेदना आता मी दुर करणार आहे - आ. लंके
------------
विस्थापितांचे राज्यातील आदर्श नगर उभारणार;हनुमाननगरचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार.
--------------
पन्नास वर्षांपासूनची निर्माण झालेली परकेपणाची भावना दुर.
 -------------
अ‍ॅड. झावरे यांनी केलेल्या चतुरपणाचा इतर सरपंचांनीही आदर्श घेण्याचे आवाहन आ. लंके यांनी केले.


पारनेर/प्रतिनिधी - 
संपूर्ण राज्यातील ग्रामिण भागाची प्रगती होत असताना हनुमाननगरची मात्र अधोगती झालेली पाहून मनाला अतिव वेदना होत असल्याचे सांगतानाच विस्थापितांचे राज्यातील आदर्श हनुमाननगर उभारण्याची घोषणा आमदार नीलेश लंके यांनी शनिवारी केली.
विविध विकास कामांच्या निमित्ताने पंधरा दिवसांपूर्वी वनकुटे येथे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांच्या निवासस्थानी मुक्कामी असलेल्या आमदार नीलेश लंके यांची भेट घेउन हनुमाननगरच्या नागरीकांनी गेल्या पन्नास वर्षांपासून ते सहन करीत असलेल्या वेदनांचे गाऱ्हाणे मांडले. त्याच वेळी तुमच्या मनातील ही खंत मी निश्‍चित दुर करील अशी ग्वाही आ. लंके यांनी दिली होती. हनुमाननगरच्या विविध समस्यांबाबत जिल्हा पुनर्वसन उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तसेच मंत्रालयातील विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आ. लंके यांनी हनुमाननगरचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार केला व पंधराच दिवसांत हनुमाननगरवासीयांची भेट घेत आदर्श नगर उभे करून त्यांच्या मनातील गेल्या पन्नास वर्षांपासूनची निर्माण झालेली परकेपणाची भावना दुर केली.


यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, जिल्हाधिका-यांनी १० एकर जमीन बिनशेती करून त्यावेळी हनुमाननगर वसविले गेले. त्यानंतर तब्बल पन्नास वर्षात तेथील मुलभूत सुविधांकडे लक्ष दिले गेले नाही, हे दुर्देव आहे. मुळा धरणाच्या माध्यमातून  इतरांना समृद्ध करण्यासाठी स्वतःच्या जमीनींचे बलीदान देणाऱ्या बळीराजाच्या नशीबी गेल्या पन्नास वर्षात आलेले दुःख, वेदना आता मी दुर करणार आहे. तुमचा भाउ दिलेला शब्द पुर्ण करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. येथील महिलांना बाराही महिने पाण्यासाठी दररोज वनवन भटकावे लागते. त्यांचा अर्धा दिवस त्यातच जातो याची कल्पना आ. लंके यांना यापूर्वीच्या भेटीत देण्यात आली होती. त्यामुळे हनुमाननगरसाठी स्वंतत्र विहीर तसेच पाईपलाईनसाठी प्रत्येकी दहा लाख रूपये मंजुर करण्यात आले. त्याचे भुमिपुजन करून आ. लंके यांनी हनुमाननगरच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. 
अखंड विजपुरवठा, प्रत्येेकाला स्वतंत्र शौचालय, रस्ते, पथदिवे, सभामंडप, डिजीटल शाळा या कामांना लवकरच प्रारंभ करण्यात येईल. विविध योजना राबवून राज्यात आदर्श नगर उभे करण्याचा मानस यावेळी आ. लंके यांनी व्यक्त केला.
तास येथील वनजमीन, त्यावरील अतिक्रमण, भुलदरा येथील शाळा हे प्रश्‍न देखील येत्या काही दिवसांत मार्गी लागलेले असतील. सन १९६९ पासून भिजत पडलेल्या के के रेेंजचा प्रश्‍न मार्गी लावण्यात आपणास काही अंशी यश आहे आहे. शासनाने सुरू केलेली जमीन अधिग्रहणाची प्रकिया खा. शरद पवार यांच्या माध्यमातून कायमची थांबविण्यात आली आहे. आता रेड झोनचा प्रश्‍न मार्गी लावल्यानंतर या भागातील शेतकरी, कष्टकरी तसेच आदीवासी सुखा समाधानाने नांदतील असा विश्‍वास आ. लंके यांनी व्यक्त केला.
 सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसच्या आय टी सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, सचिन काळे, संदीप चौधरी, आरती ढोरमले, कविता ढवळे, गणेश इरोले, अमोल शिंदे, मधुकर शिंदे, संतोष केसकर, पळशीचे सरपंच गणेश मधे, सुनिल कोकरे, बाळासाहेब लंके, उपसरपंच अर्जुन कुलकर्णी, सुहास सालके, कारभारी मुसळे, बाळासाहेब खामकर, काशिनाथ भगत, नसीर शेख, विक्रम शिंदे, शरद आग्रे, राजू डहाळे, रामदास साळवे, पवन खामकर, बाबाजी गागरे, प्रकाश केदारी, गणेश हाके, नारायण बिलबिले, संपत जाधव, अजित सांगळे, शाम पवार आदी उपस्थित होते.

चतुर सरपंच !
तीन वर्षात तब्बल दहा कोटींचा निधी उपलब्ध करून देणारा अ‍ॅड. राहुल झावरे हा चतुर सरपंच तुम्हाला मिळाल्याची मिश्कील टिपन्नी आ. लंके यांनी यावेळी बोलताना केली.  अनेकदा त्यांनी आमचाही निधी तुमच्यासाठी पळवून आणल्याचे सांगतानाच केवळ आपल्या गावातील बांधवांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅड. राहुल झावरे यांनी केलेल्या चतुरपणाचा इतर सरपंचांनीही आदर्श घेण्याचे आवाहन आ. लंके यांनी केले.

५० वर्षानंतर त्यांनी पाहिले आमदार !
मुळा धरणात जमीनी गेल्यानंतर विस्थापित शंभर कुटूंबांचे वनकुटे येथील हनुमाननगर येथे पुनर्वसन करण्यात आले. सुरूवातीस दिलेल्या सुविधांनंतर या नगराकडे ना शासनाचे प्रतिनिधी फिरकले ना लोकप्रतिनिधी ! सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांच्या माध्यमातून आ. लंके यांच्या कानावर हनुमाननगरच्या नागरीकांची परवड गेली आणि आ. लंके यांनी थेट हनुमाननगर गाठून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा तसेच राज्यातील आगळया वेगळया नगराची उभारणी करून देण्याचा शब्द दिला. आ. लंके यांच्या रूपाने या विस्तापितांनी गेल्या पन्नास वर्षात पहिल्यांदाच हनुमाननगरमध्ये आमदार पाहिले!