Breaking News

कृषी, सहकारात सातारा जिल्हा बॅंकेचे काम आदर्शवत

 


सातारा - कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था व सहकार क्षेत्रात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे काम आदर्शवत असल्याचे प्रतिपादन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.

विकास सेवा संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सातारा जिल्हा बॅंकेने केलेल्या उपाययोजना, संगणकीकरण व अत्याधुनिक डेटा सेंटरच्या अभ्यासासाठी सांगली जिल्हा बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बॅंकेला भेट दिली. त्यावेळी डॉ. सरकाळे ते बोलत होते. ते म्हणाले, बॅंकेने सेवांचे जाळे ग्रामीण भागातील तळागाळांपर्यंत विस्तारले आहे. एटीम, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस बॅंकिंग, मोबाइल बॅंकिंग ऍप, इंटरनेट बॅंकिंग, यूपीआय आदी आधुनिक बॅंकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. ही बॅंक सहकार क्षेत्रामध्ये संपूर्ण देशात अव्वल स्थानी आहे. बॅंकेला नाबार्ड, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सहकार क्षेत्रातील सर्वोच्च बॅंक म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये नोंद झाली आहे. सुरुवातीपासून चांगले नेतृत्व लाभल्याने बॅंकेचे कामकाज आदर्श आहे. रिझर्व्ह व नाबार्ड यांचे नियम व निकषांचे बॅंकेने तंतोतंत पालन केले आहे.

बॅंकेच्या गेल्या सात दशकांच्या वाटचालीची माहिती सरव्यवस्थापक राजीव गाढवे यांनी दिली. वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जांमधील लक्षणीय वाढ, निधीचे नियोजन, शून्य टक्के निव्वळ एनपीए, ग्राहकाभिमुख सेवांमुळे बॅंकेस आयएसओ 9001-2008 मानांकन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सातारा जिल्हा बॅंकेने विकासाभिमुख उपक्रम राबविले आहेत. ग्रामीण भागातील सभासदांचे कल्याण व कृषी उत्पादनवाढीसाठी केलेले काम उत्कृष्ट असल्याचे गौरवोद्‌गार सांगली जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापक एस. बी. सावंत यांनी काढले. सातारा जिल्हा बॅंकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, विविध विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अधिकारी उपस्थित होते.