सिद्धटेक येथे मोठी कारवाई ; 13 लाखांच्या यांत्रिक बोटी जप्त डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांची धडाकेबाज कारवाई कर्जत/प्रतिनिधी ः उपविभागीय प...
सिद्धटेक येथे मोठी कारवाई ; 13 लाखांच्या यांत्रिक बोटी जप्त
डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांची धडाकेबाज कारवाई
कर्जत/प्रतिनिधी ः उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी वाळू तस्करांविरुद्धची मोहीम सुरूच ठेवली आहे. आज सिद्धटेक येथे मोठी कारवाई करत अवैध वाळू उपसा करणार्या यांत्रिक बोटी जप्त केल्या. पोलीस पथकासह स्वतः भीमा नदी पात्रात उतरून डीवायएसपी जाधव यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कर्जत तालुक्यातील सिध्दटेक गावाच्या शिवारात भिमा नदीपात्रात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने अवैध वाळु उपसा होत आहे. माहिती मिळताच तात्काळ सूत्रे हलवत त्यांनी कारवाईसाठी कर्जत व श्रीगोंदा पोलिसांना सोबत घेतले. सिद्धटेक येथील गणपती मंदीराच्या मागे यांत्रिक बोटीच्या सहाय्याने नदीपात्रातून वाळुचे संकलन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. स्वत: नदीपात्रात उतरून त्यांनी छापा टाकला. या छाप्यात त्यांनी अवैध गौणखनिज काढण्यासाठी वापरलेल्या 13 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या यांत्रिक बोटी जप्त केल्या. पोलीस नाईक आप्पासाहेब कोळेकर यांच्या फिर्यादीवरुन या वाळु तस्करांविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या यांत्रिक बोटीस असणारे इलेक्ट्रीक इंजन हे आरोपींनी कोठुन मिळवले आहे ? त्याची खरेदी कोठुन झाली ? ते कोणाचे मालकीचे आहे ? यांत्रिक बोटीस वाळू उपसा करण्यासाठी असणारे इतर साहित्य कोठुन खरेदी केले. अवैध गौणखनिजाची यापुर्वी कोणकोणास विक्री केली? याबाबतचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे हे करीत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल तुळसीदास सातपुते, पोलीस नाईक भरत गडकर, आप्पासाहेब कोळेकर, पोलीस कॉन्स्टेबल हदय घोडके, संतोष साबळे, सागर जंगम, अदित्य बेल्हेकर, सुनिल खैरे, मनोज लातुरकर, प्रकाश दंदाडे, योगेश भापकर, समीर सय्यद, आण्णा परीट, प्रकाश मांडगे, गणेश ठोंबरे, होमगार्ड नय्युम पठाण यांनी ही धडाकेबाज कारवाई स्पीड बोटीचे सहाय्याने पाण्यात पोहुन अथक परिश्रम करुन केलेली आहे.
नियोजनबद्ध कारवाई
उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी यापूर्वी भोर, गडचिरोली येथे पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. नियोजनबद्ध पद्धतीने कारवाया हे त्यांचे वेगळेपण आहे. सिद्धटेक येथील भिमा नदीपात्रात सध्या जास्त खोलीचे आहे. या कारवाईत त्यांनी पोहण्यात पटाईत असलेल्या पोलीस कर्मचार्यांची निवड केली. तेथील परिस्थितीची पूर्ण माहिती संकलित करून त्यांनी पुर्व नियोजन केले होते. स्पिड बोटीच्या सहाय्याने पाण्यात शिरून त्यांनी ही कारवाई केली आहे. बोटी जप्त करून खोडावर घाव घातल्याने त्यांची कामगिरी अभिनंदनास पात्र ठरली आहे.