Breaking News

भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादीत बंडखोरी ! पुणे : राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.

भाजपने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्ष पदवीधर व शिक्षक मतदार संघातील उमेदवार निवडीचा पेच कसा सोडवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पुणे विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अरुण अण्णा लाड यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. अरुण अण्णा लाड हे क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. तसेच स्वातंत्र्य सैनिक - क्रांतीअग्रनी स्वर्गीय जी. डी. बापू लाड यांचे पुत्र आहेत.

राष्ट्रवादीकडून अरुण लाड यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे. कारण, राष्ट्रवादी समर्थक प्रताप माने यांनीही पुणे पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर , भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला आहे. त्यामुळे भाजपची देखील बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली असतानाच राष्ट्रवादीच्या अडचणीत देखील भर पडत आहे.