शेतकरी भयभीत जीव मुठीत घेऊन रात्री जावे लागते पाणी भरायला चांदबिबी महाल परिसरात फिरण्यास बंदी नगर ता./प्रतिनिधी : जिल्ह्यात बिबटयाचा वाव...
शेतकरी भयभीत जीव मुठीत घेऊन रात्री जावे लागते पाणी भरायला
चांदबिबी महाल परिसरात फिरण्यास बंदी
नगर ता./प्रतिनिधी : जिल्ह्यात बिबटयाचा वावर मोठया प्रमाणावर वाढला असून, पाथर्डी, कोल्हार, पारनेर तालुक्यापाठोपाठ आता नगर तालुक्यामध्ये बिबटयाचा वावर वाढलेला आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील शेतकर्यांना जीव मुठीत धरून शेती करावी लागत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
नगर तालुक्यातील जेऊर, माथणी, चांदबिबी महाल परिसर, आठवड आदी परिसरात बिबट्या दिसुन आले आहेत. त्यामुळे चांदबिबी महाल परिसरात फिरण्यास प्रशासनाने बंदी केली आहे. तालुक्यात बिबटयाचा वावर वाढला आहे. मात्र सुदैवाने कोणावरही अद्याप बिबट्याने हल्ला केला नसला तरी नागरिकांच्या मनात मोठी भिती निर्माण झाली आहे. सध्या शेतात पिकांना पाण्याची नितांत गरज असल्याने शेतकर्यांना रात्रीच्या वीजेच्या वेळेमध्ये शेतात जावे लागत आहे. अशातच जीव मुठीत धरुन शेतकरी शेती करत आहे. त्यामुळे महावितरणने सध्यातरी परिस्थिती पाहता दिवसा वीज द्यावी, अशी मागणी शेतकर्यांमधून जोर धरू लागली आहे. सोशल मीडियातुन अनेकदा कोणतीही शहानिशा न करता गावांमध्ये बिबट्या आल्याची अफवा पसरवली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अफवा पसरवणार्या व्यक्तींवर कार्यवाही करण्याची मागणी नागरिक करत आहेत. नगर तालुक्यातील ज्याठिकाणी बिबट्यांचे दर्शन घडले आहे, त्या ठिकाणी संबंधित विभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. कोरोना परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, यंदा कांदा उत्पादनाला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र शेतामध्ये असणारे गहू, ज्वारी हरभरा या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या सुरक्षेच्या जबाबदारीचे काय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
----------------------------
बिबटयाचा वावर वाढला असतानांच, शेतकर्यांना दिवसा वीज उपलब्ध नसल्यामुळे रात्री पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे. मात्र भविष्यात सोलर प्रोजेक्ट द्वारे शेतकर्यांना शेतीपंपासाठी दिवसा वीज देण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे अशीच प्रक्रिया काही याठिकाणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
किसन कोपणर (महावितरण कार्यकारी अभियंता, ग्रामीण विभाग)
------------------------------
शेतकर्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे. त्याचबरोबर सोलर प्रोजेक्ट सुरू होईपर्यंत बराच कालावधी जाणार आहे. मात्र तोपर्यंत शेतकर्यांना दिवसा वीज मिळावी ही नगर तालुका भाजपच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास लवकरच जन आक्रोश आंदोलन करण्यात येईल.
मनोज कोकाटे (भाजपा, नगर तालुका अध्यक्ष)
---------------------------
शेतकर्यांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे त्याचबरोबर फटाके वाजवणे, हातामध्ये घुंगराची काठी ठेवणे, शेतात बसून किंवा वाकून काम करू नये. तसेच शेतामध्ये मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणे लावणे, या प्रथम उपाय योजना शेतकर्यांनी करणे गरजेचे आहे. तसेच बिबट्या आढळून आल्यास तातडीने वन विभागाला कळवावे जेणेकरून वनविभागाला योग्य त्या उपाययोजना करता येतील.
सुनील थिटे - वनपरिक्षेत्र अधिकारी. नगर तालुका)