नाशिक / प्रतिनिधी देशात व राज्यात कोरोनाची लाट येण्याच्या शक्यतेने पुन्हा एकदा जनता कर्फ्यु लागू होण्याच्या अफवेमुळे राज्यातील काही प्रमुख ब...
नाशिक / प्रतिनिधी
देशात व राज्यात कोरोनाची लाट येण्याच्या शक्यतेने पुन्हा एकदा जनता कर्फ्यु लागू होण्याच्या अफवेमुळे राज्यातील काही प्रमुख बाजारपेठांमध्ये शेतमालाचे भाव कोसळले आहेत. अफवेमुळे मालाचा पुरवठा वाढून कांदा, हरभरा, सोयाबीन यांचे दर काही प्रमाणात कोसळले आहेत.
दिल्ली, अहमदाबाद आदी ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी येण्याची भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. मात्र, तूर्त लॉक डाउन करण्याचा विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर समाजमाध्यमांतून लवकरच जनता कर्फ्यु लागू होणार असल्याची अफवा पसरली. त्यामुळे सोमवारी नगर व नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेत कांद्याची मोठी आवक झाली. नगर जिल्ह्यात घोडेगाव, नगर व श्रीरामपूर बाजार समितीत सव्वा लाख गोणी कांद्याची, तर नाशिक जिल्ह्यात 12 हजार ट्रॅक्टर कांदा बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आला होता. त्यामुळे कांद्याच्या दरात 500 ते एक हजार रुपये क्विंटलने घट झाली. पाच हजार रुपये क्विंटलने विकला जाणारा कांदा चार हजार रुपयांवर आला आहे.