Breaking News

अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर


नवी दिल्ली/ प्रतिनिधी

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना  सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अर्णवसह इतर दोन जणांना अंतरिम जामीन देण्यात आला आहे. न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना 50 हजारांच्या हमीवर अंतरिम जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रायगड पोलिसांना कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले असून, अंतरिम जामिनासाठीचा अर्णव गोस्वामींचा अर्ज नामंजूर करणे, ही मुंबई उच्च न्यायालयाची चूक होती, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

अर्णव गोस्वामी यांनी ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरीश साळवे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती  चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या बेंचसमोर गोस्वामींच्या याचिकेवर सुनावणी झाली. अर्णव गोस्वामींसाठी ज्येष्ठ वकील हरीश साळवेंनी युक्तिवाद केला. हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्णव गोस्वामींविरुद्धची एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना 50 हजारांच्या हमीवर अंतरिम जामीन मंजूर केला. नीतिश सारडा आणि फिरोझ शेख यांनाही सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सकाळी 11 वाजता सुरु झालेली सुनावणी 4.15 पर्यंत सुरु होती. या सुनावणीत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवले. मुंबई हायकोर्ट व्यक्तीच्या स्वातंत्र्यांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले, असेनिरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले.