आदर पूनावालांनी दिली कोव्हिशिल्ड लसीबाबत महत्वाची माहिती पुणे : गेले आठ महिने देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोट्यवधी लोकांना...
आदर पूनावालांनी दिली कोव्हिशिल्ड लसीबाबत महत्वाची माहिती
पुणे : गेले आठ महिने देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोट्यवधी लोकांना या रोगाचीलागण झाली तर लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या रोगावर ठोस औषध नसल्याने करण्यात आलेल्या ताळेबंदीमधून सावरत असतानाच दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे पुन्हा उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
अशातच एक सकारात्मक वृत्त समोर येत आहे. पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून (SII) विकसित करण्यात येत असलेली 'कोव्हिशिल्ड' ही लस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 90 टक्के प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. ही माहिती खुद्द सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिली आहे.
"कमी किमतीत उपलब्ध होणारी कोव्हिशिल्ड लस एका प्रकारच्या डोसमध्ये कोरोनावर 90 टक्के प्रभावी ठरत आहे. तर दुसऱ्या प्रकारच्या डोसमध्ये 62 टक्के प्रभावी आहे. याबाबतची विस्तृत माहिती संध्याकाळी देण्यात येईल." असं आदर पुनावाला म्हणाले आहेत. तसेच, या लसचे वितरणदेखील लवकरच सुरु होईल अशी खुशखबर त्यांनी दिली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी ते काय माहिती सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून इतर अन्य कंपनीच्या लस देखील प्रगतीपथावर असल्याचं समजत आहे.