Breaking News

.तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही

 

.तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही

पुणे : शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारची मोट बांधली. सध्या ते आपल्या तालावर सरकारही चालवत आहेत. मग ज्यादिवशी पवारांना वाटेल तेव्हा त्यांनी सुप्रिया सुळे यांनाच मुख्यमंत्री करावे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. मराठा समाजातील महिला मुख्यमंत्री कोण हा आम्ही ठरवण्याचा विषय नाही. जिच्यात क्षमता आहे ती स्त्री मुख्यमंत्री व्हावी. त्यात कोणत्या एका समाजाचं असं काही नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शुक्रवारी मुंबईतील एका कार्यक्रमात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, असे वक्तव्य केले होते. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांना शनिवारी पुण्यात याविषयी विचारणा करण्यात आली.

तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी मराठा महिला मुख्यमंत्री कोण, हा आम्ही ठरवण्याचा विषय नसल्याचे स्पष्ट केले. उद्या शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करावेसे वाटले तर त्यांनी करावे. त्यात आमचा रोल काय? आम्ही सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री केले होते. त्यामुळे भाजपने कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर तर वेळ लागणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आशिष शेलार काय म्हणाले होते?

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या 'कर्तृत्वान मराठा स्त्रिया' या पुस्तकाचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. "संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं," असं शेलार यांनी सांगितलं.