Breaking News

शिवसेना खासदारापाठोपाठ आमदार राजू पाटील रेल्वे अधिकाऱ्यांच्या भेटीला ठाणे : शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल (11 नोव्हेंबर) रेल्वेशी संबंधित पुलाच्या कामासाठी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर आज मनसेचे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेत रखडलेले प्रकल्प लवकर मार्गी लावण्याची मागणी केली आहे. शिवसेना-मनसे विकास कामांसाठी पाठपुरावा करीत आहे त्याप्रमाणे भाजप यात कुठेही दिसत नाही. याचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला बसणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

कल्याणमध्ये सुरु असलेल्या पत्रीपूलाच्या कामाबाबत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला. दीड वर्षांपासून पुलाचे काम सुरु आहे. येत्या 21 आणि 22 नोव्हेंबरला या पुलाचा 709 मेट्रीक टनाचा गर्डर बसविला जाणार आहे. त्यामुळे हा पूल वाहतूकीसाठी लवकरच खुला होईल, अशी आशा आहे. या व्यतिरिक्त शिंदे यांनी कटाई येथील विकासकामाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलणी केली होती.

खासदारांनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे डीआरएमची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दिवा रेल्वे उड्डाणपूल, लोकग्राम रेल्वे पादचारी पूल आणि पलावा जंक्शन येथील रेल्वे उड्डाणपूलाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या तीनही पुलांच्या कामात रेल्वे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये समन्वय नसल्याने कामांला विलंब होत आहे, असा आरोप राजू पाटील यांनी केला आहे .

दिवा उड्डाणपुलाचे काम जवळपास होत आलं आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेकडून समन्वय नसल्याने हा उड्डाणपूल रखडला आहे. लवकरात लवकर रेल्वे आणि स्थानिक स्वराज्यसंस्थेने ही कामे मार्गी लावावी, अशी मागणी केली आहे.

कल्याण-डोंबिवलीत महापालिकेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. विकासकामांचा पाठपुरावा पाहता शिवसेना आणि मनसेने तयारी सुरु केली आहे. मात्र भाजपकडून कोणत्याही प्रकार हालचाल नाहीत. त्यामुळे महापालिका निवडणूकीत भाजपला फटका बसणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.