Breaking News

मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार राज्य सरकार उचलणार!

- वैद्यकीय शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरु करणार

- वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती


मुंबई/ प्रतिनिधी

वैद्यकीय शाखेतील प्रवेशात आरक्षणापासून वंचित राहणार्‍या मराठा विद्यार्थींच्या फी चा भार राज्य सरकार उचलणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती असतानाही वैद्यकीय शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून प्रवेश प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. 

वैद्यकीय शाखांचे शैक्षणिक वेळापत्रक पाळावे लागते. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू करावी लागेल. आरक्षणाचा लाभ न मिळाल्याने ज्यांचे नुकसान होणार आहे, त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पर्यायांवर चर्चा सुरू असल्याचे देशमुख म्हणाले. यापूर्वी जेव्हा असे झाले होते त्यावेळी अशा विद्यार्थ्यांची फी सरकारने भरली होती. आताही त्या पर्यायावर विचार सुरू असून, मंत्रिमंडळापुढे वैद्यकीय शिक्षण विभाग त्याबाबत प्रस्ताव मांडणार आहे. मराठा आरक्षण स्थगिती आहे, त्यामुळे सगळी प्रवेश प्रक्रिया थांबवता येणे शक्य नाही. आरक्षणाचा लाभ मिळाला असता तर जेवढी फी द्यावी लागली असती तेवढीच फी द्यावी लागणार आहे. अतिरिक्त भार सरकार उचलणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आरक्षण मिळाल्यास जो फायदा झाला असता तोच फायदा आता विद्यार्थ्यांना देणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा;
मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार गंभीर दिसत नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती ठोक मोर्चाने मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे. ही समिती बरखास्त करून या समितीत नव्या सदस्यांचा समावेश करावा, अशी मागणीही मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली. मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. मराठा आरक्षण उपसमितीचा मराठा समाजाला काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे ही समिती बरखास्त करून नव्या सदस्यांचा समितीत समावेश करावा. काम करणार्‍यांनाच समितीत संधी देण्यात यावी, अशी मागणी आबा पाटील यांनी केली.